नंघारारुपी संग्रहालय भूमिपूजन कार्यक्रम पूर्वतयारीचा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा

0
19
  • यात्रेच्या धर्तीवर सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना
  • पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधांना प्राधान्य द्या

वाशिम, दि. २२ : श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे मंजूर नंघारारुपी संग्रहालाच्या वास्तूचे भूमिपूजन ३ डिसेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने पोहरादेवी यात्रेच्या धर्तीवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या. भूमिपूजन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित सर्व शासकीय विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, कारंजाचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, भूमिपूजन सोहळ्याला पोहरादेवी यात्रेप्रमाणेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. त्या दृष्टीने त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मुबलक स्वरुपात उपलब्ध करून देण्याबरोबरच कार्यक्रमस्थळ, मंदिर परिसर यासह इतर ठिकाणी स्वच्छतेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या कालावधीत आरोग्यविषयक सुविधा ही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जाव्यात. तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सोपविण्यात आलेली जबाबदारी सर्व संबंधित विभागांनी व्यवस्थितपणे सांभाळावी. याठिकाणी उपस्थित भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.