कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान

0
25

पवनी,दि.23 : : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला शुक्रवारी मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन संस्था, वनविभागाच्या दलाने मिळून जीवदान दिले. गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात नेहमीच अभयारण्यातील वन्यप्राणी पडण्याच्या घटना घडतात.
आजवर मैत्रने 25 च्यावर प्राण्यांचा जीव वाचविला आहे.गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याच्या गुडेगाव बीट क्रमांक 1 मध्ये सांबर कालव्यात पडल्याची माहिती बीटरक्षक ए. व्ही. खेंते यांनी भ्रमणध्वनीवरून वन मैत्रचे सचिव माधव वैद्य यांना दिली. त्यानंतर वैद्य आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे कर्मचारी व सदस्यांनी संयुक्तरीत्या प्रयत्न करून सांबराला चार तासाच्या अथक परिश्रमानंतर कालव्यातून बाहेर काढले. वनपरिक्षेत्राधिकारी कोमल जाधव, मैत्रचे अध्यक्ष महादेव शिवरकर यांच्या मार्गदर्शनात संघरत्न धारगावे, राहुल वाघमारे, महेश मठीया, अतुल जुमळे, प्रफुल्ल रामटेके, अमोल वाघधरे, चंद्रकांत काटेखाये, चंदू देशमुख, मनोज भुरे यांनी सहकार्य केले.