तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सकांच्या चौकशीचे आदेश

0
14

भंडारा,दि.05ः- जिल्हा सामान्य रूग्णालयातील गलथान कारभाराविषयी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी थोरात यांच्या चौकशीचे आदेश शासनाने दिले असून त्याकरीता पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. डॉ. थोरात यांच्या कार्यकाळात जिल्हा सामान्य रूग्णालयातील आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडल्याची लेखी तक्रार भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार रामचंद्र अवसरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह पालकमंत्री यांच्याकडे करीत डॉ. माधुरी थोरात यांच्यासह निवासी वैद्यकीय डॉ. सुनिता बढे यांना तात्काळ निलंबीत करण्याची मागणी केली होती. चौकशी समितीमध्ये डॉ.पी.डी.मडावी जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रूग्णालय वर्धा, डॉ.के.झेड.राठोड सहाय्यक संचालक नागपूर, डॉ.सिमा पारवेकर निवासी वैद्यकीय अधिकारी डागा स्त्री रूग्णालय नागपूर, डॉ.अनुपम हिवलेकर निवासी वैद्यकीय अधिकारी सामान्य रूग्णालय वर्धा, अनुजा बारापात्रे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा यांचा समावेश आहे.
दि. १९ नोव्हेंबर २0१८ च्या उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर मंडळ,नागपूर यांच्या पत्रानुसार, जिल्हा सामान्य रूग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी थोरात व सध्या कार्यरत असलेले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता बढे यांच्यावर लोकप्रतिनिधींशी उर्मट शब्दांचा प्रयोग करून उत्तरे देणे, मुख्यालयी न राहणे, रूग्णांची हेळसांड करणे व त्यांना लहान-सहान कारणांसाठी नागपूर येथील शासकीय किंवा खाजगी रूग्णालयात रेफर करणे यासह जिल्हा सामान्य रूग्णालयातील गलथान कारभाराला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दोन-तीन महिन्याअगोदर जिल्हा सामान्य रूग्णालयातील राज्यात प्रथम क्रमांक असलेल्या डायलेसीस विभागातील कर्मचार्‍यांना तडकाफडकी कामावरून काढुन टाकल्याने त्याचा विपरीत परिणाम डायलेसीस रूग्णावर होवून एकाच आठवड्यात सहा डायलेसीस रूग्णांचा मृत्यू झाला होता. त्यावर आ. अँड. रामचंद्र अवसरे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी थोरात यांना डायलेसीस रूग्णांची होणार्‍या गैरसोयीबद्दल फोन करून चौकशी केली असता डॉ.माधुरी थोरात यांनी फोनवरून उर्मटपणे उत्तरे दिली.
आ.रामचंद्र अवसरे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आरोग्य उपसंचालक,आरोग्य सेवा, नागपूर मंडळ नागपूर यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील गलथान कारभाराची चौकशी करण्यासंदर्भात पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत केली असून सदर चौकशी समितीने आ.अवसरे यांच्या तक्रारीत नमूद विषयांचा तत्परतेने सखोल चौकशी करून चौकशी अहवाल आवश्यक त्या दस्तऐवजासह कार्यालयास सादर करावे असे पत्रात नमुद करण्यात आले आहे.