गोवर रुबेला लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू

0
4

लाखनी,दि.13ः-गोवर रुबेला लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील लाखोरी येथे घडली. आराध्या रंजीत वाघाये (११ महिने) रा. लाखोरी असे चिमुकलीचे नाव आहे. गोवरचे निर्मूलन आणि रुबेलावर नियंत्रणासाठी ९ महिने ते १५ वर्षाचे बालकांना गोवर रुबेला लसीकरण मोहिम जिल्ह्यात सुरु आहे. ५ डिसेंबर रोजी आराध्या हिला अंगणवाडी केंद्र लाखोरी येथे दुपारच्या सुमारास लस देण्यात आली. सायंकाळी तिची प्रकृती बिघडून उलट्या व शौच झाल्याने दुसर्‍या दिवशी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे भरती केले. प्रथमोपचार करुन सामान्य रुग्णालय भंडारा व त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे पाठविण्यात आले. ७ डिसेंबर रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृत्यूनंतर पोलिसात तक्रार न करताच उत्तरीय परिक्षण करण्यात आल्याने आरोग्य विभाग प्रकरण दडपण्याचे तयारीत असल्याचा आरोप कुटुंबीयानी केला आहे. लसीकरण केंद्रावरही वैद्यकीय चमू उपस्थित नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणने आहे. त्यामुळे या लसीकरण मोहिमेस गालबोट लागले आहे.