ध्वजदिन निधी संकलनातून सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी- निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे

0
22

वाशिम, दि. १3 : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले. नियोजन भवन येथे बुधवारी आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश कटके, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, सहाय्यक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे यांच्यासह जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक, नागरीक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री. हिंगे म्हणाले, देशाचे रक्षण करताना धारतीर्थ पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वजदिन निधीचा उपयोग होतो. यावर्षी जिल्ह्याला ४१ लक्ष ५३ हजार ४७२ रुपये निधी संकलनाचे उद्दिष्ट असून प्रत्येक नागरिकाने या निधी संकलनात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सैन्यामध्ये सेवा देवून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी स्वच्छ भारत अभियानात सक्रीय सहभाग नोंदवून समाजाला शिस्त लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होवून पर्यावरण रक्षणात योगदान देण्याचे आवाहनही श्री. हिंगे यांनी यावेळी केले. जिल्ह्यातील मोठा युवावर्ग सैन्य व पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणे आहे. याकरिता माजी सैनिकांनी पुढाकार घेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. याकरिता आवश्यक सहकार्य जिल्हा प्रशासनाकडून केले जाईल, असे श्री. हिंगे यांनी यावेळी सांगितले. श्री. कटके, श्री. वायाळ यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

दीपप्रज्ज्वलन व शहीद स्मृतीचिन्हाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी वीरपत्नी शांताबाई यशवंत सरकटे, पार्वतीबाई दगडू लहाने यांचा साडीचोळी देवून सत्कार करण्यात आला. तसेच गतवर्षी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात योगदान देणाऱ्या शासकीय विभाग प्रमुखांचाही यावेळी गौरव करण्यात आला.जवाहर नवोदय विद्यालयाच्या चमूने यावेळी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. चरडे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. गजानन वाघ यांनी केले. आभार जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधीक्षक भगवान मापारी यांनी मानले.