पारधी बेड्याला महसुली गावाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार-किशोर तिवारी

0
28

वाशिम, दि. १3 : पारधी समाजाची वस्ती असलेल्या पारधी बेड्यांना अद्याप महसुली गावांचा दर्जा नसल्याने या बेड्यांवर आवश्यक सोयी-सुविधा निर्मिती होवू शकलेली नाही. त्यामुळे सर्व पारधी बेड्यांना महसुली गावांचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले. मानोरा तालुक्यातील खंडाळा पारधी बेडा येथे १२ डिसेंबर रोजी आयोजित ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमात ते बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी शरद जावळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद कापडे, कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. तायडे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मेहकरकर, तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, श्री. चव्हाण, गट विकास अधिकारी श्री. गोहाड, सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले, यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व जिल्ह्यातील खंडाळा, मजलापूर, हिरंगी, चिखली झोलेबाबा, जुनना (बुजरूक) ह्या खेड्यातील पारधी बांधव उपस्थित होते.

श्री. तिवारी म्हणाले, फासेपारधी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून पारधी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्याचा लवकरात लवकर निपटारा करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील काही पारधी बेड्यांवर अद्याप पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याबाबत श्री. तिवारी यांनी खेद व्यक्त करून या पारधी बेड्यांवर तातडीने पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.फासेपारधी समाजाला अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा. त्यांना अन्नापासून वंचित ठेवण्याचा कोणालाही अधिकार नाही. रोजगार हमी योजना तसेच इतर माध्यमातून पारधी समाजातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

केंद्र व राज्य शासनाने २०२० पर्यंत सर्वांना घर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पारधी कुटुंबाना घरे मिळतील याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. तसेच पारधी बेड्यावर शिक्षण व आरोग्याच्या सुविधा वेळेवर उपलब्ध करून दिल्या जाव्यात. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ येथील  गरजू व्यक्तींना मिळवून देण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करावे, असे श्री. तिवारी यावेळी म्हणाले.श्री. तिवारी यांनी यावेळी पारधी बेड्यावरील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधित शासकीय विभागांना दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मतीन भोसले यांनी केले.