गडचिरोली नगर परिषद शाळांतील ५१ शिक्षक वेतनाविना

0
13

गडचिरोली, ता.१4: येथील नगर परिषद शाळांतील ५१ शिक्षकांना मागील दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. या शिक्षकांना मागील १७ वर्षांपासून पदोन्नती मिळाली नसून, चटटोपाध्याय वेतनश्रेणीची रक्कम येऊनही पाच वर्षांपासून शिक्षकांना झुलवत ठेवण्यात येत असल्याने नगर परिषद प्रशासन व सत्ताधारी नगरसेवकांप्रती कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गडचिरोलीला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर १९९८ मध्ये शहरात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा नगर परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आल्या. तेव्हापासून नगर परिषदेने शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. शहरात नगर परिषदेतर्फे चालविण्यात येणाऱ्या १० शाळा असून, ५१ शिक्षक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे रामनगर येथील जवाहरलाल नेहरु उच्च प्राथमिक शाळेला अलिकडेच आयएसओ मानांकन मिळाले असून, अन्य तीन शाळा हे मानांकन प्राप्त करण्याच्या तयारीत आहेत. असे असतानाही शिक्षण विभाग, नगर परिषद प्रशासन व सत्ताधारी नगरसेवक शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. नगर परिषद शाळांतील शिक्षकांना दरमहा वेतन मिळत नाही. मागील जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांचे वेतन अजूनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षकांनी घेतलेले गृहकर्ज व सहकारी पतसंस्थांच्या कर्जाचा मासिक हप्ता वेळेवर फेडता येत नाही. परिणामी या शिक्षकांवर प्रत्येकी ६ हजार रुपये भुर्दंड बसत आहे. वेतनाबरोबरच या शिक्षकांना चट्टोपाध्याय वेतनश्रेणीची थकबाकीही मागील ५ वर्षांपासून अदा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे ही रक्कम शिक्षण उपसंचालकांकडून नगर परिषदेला आधीच प्राप्त झालेली आहे. या शिक्षकांना पदोन्नतीच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. पदोन्नतीअभावी अनेक सेवाज्येष्ठ शिक्षकांना प्राथमिक शिक्षक म्हणूनच सेवानिवृत्त व्हावे लागले. परिणामी त्यांचा सेवानिवृत्ती वेतनावरही फरक पडला. सद्य:स्यितीत मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अध्यापन व अध्ययन प्रक्रियेवर विपरित परिणाम झाला आहे. या संदर्भात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन समस्या तत्काळ निकाली काढण्याची मागणी केली आहे.