तालुका क्रीडा संकुल देवरी अंतर्गत बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण व संरक्षण भिंतीचे भूमीपूजन 

0
24

गोंदिया दि.१९: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत तालुका क्रीडा संकुल देवरी येथील बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण व संरक्षण भिंतीचे भूमीपूजन नुकतेच आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरी नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे होत्या. यावेळी देवरी न.प.उपाध्यक्ष आफताब शेख, पं.स.सभापती सुनंदा बहेकार, नगरसेवक सर्वश्री दविंदर कौर भाटीया, नूतन कोवे, संध्या गाढवे, प्रविण दरेकर तसेच विरेंद्र अंजनकर, प्रमोद संगीडवार, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, प्रकल्प वास्तुविशारद दिनेश नवनागे, प्रकल्प कंत्राटदार लखनलाल धावडे, पशुधन विकास अधिकारी डॉ.कोळेकर व गटनेते संतोष तिवारी उपस्थित होते.
यावेळी आमदार संजय पुराम म्हणाले, ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्तम क्रीडा सुविधा देण्याचा तसेच तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय खेळ खेळण्याच्या दृष्टीकोनातून तालुका क्रीडा संकुलात प्रस्तावित दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करुन निश्चितच राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होण्यास सहकार्य मिळेल. तालुका क्रीडा संकुल समितीचे कार्य चांगले असून देवरी तालुक्यात शालेय तालुकास्तर, जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेचे तसेच विविध अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन उत्तमरित्या करुन देवरी तालुक्यात खेळमय वातावरण निर्मीती होण्यास सहकार्य मिळत असते असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना कौशल्या कुंभरे म्हणाल्या, शासकीय उपक्रमात मुलींचा सहभाग कमी प्रमाणात होत असून शासनस्तरावर मुलींचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे व मुलींनी शासकीय उपक्रमात सहभागी होवून आपल्या तालुक्याचा तसेच जिल्ह्याचा नावलौकीक करावा असे सांगितले.
प्रास्ताविकातून जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी क्रीडा संकुलातील प्रस्तावित क्रीडा सुविधांबाबत विस्तृत माहिती देवून तालुका व जिल्हा तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्तम प्रकारच्या क्रीडा सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करुन निर्माण होणाऱ्या क्रीडा सुविधांमध्ये दर्जेदार क्रीडा सुविधा देण्यात येतील असे ते म्हणाले.
कार्यक्रमास देवरी तालुक्यातील क्रीडाप्रेमी, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळमय वातावरणात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे संचालन ए.आर.चांदेवार यांनी केले, उपस्थितांचे आभार तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा संकुलाचे सर्व कर्मचारी व देवरी तालुक्यातील खेळाडू यांनी सहकार्य केले.