‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१८ ’चा समारोप

0
8
????????????????????????????????????

वाशिम, दि. २३ : राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचलनालयाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित दोन दिवसीय ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१८’चा आज समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय चळवळीतील प्रा. कमलाकर टेमधरे होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह प्रभाकर घुगे, राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे सचिव माधवराव शेवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्रा. टेमधरे म्हणाले, ग्रंथ हा माणसाचा सर्वात चांगला गुरु असतो. ग्रंथ वाचनामुळे आपल्याला ज्ञान मिळते आणि या ज्ञानामुळेच आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. या आत्मविश्वासाचा जोरावर आपण जीवनातील संकटांचा सामना करू शकतो, जीवनात यशस्वी होऊ शकतो. आज विविध कारणांमुळे लोक वाचनापासून दुरावले असले तरी ग्रंथांचे महत्त्व सदैव कायम राहणार आहे. आजच्या तरुण पिढीला ग्रंथ वाचनाची आवश्यकता आहे. त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी त्यांनी ग्रंथ वाचनाला प्राधान्य द्यावे. सार्वजनिक वाचनालयांनी ग्रामीण भागात वाचन चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. वाचन चळवळीत सार्वजनिक वाचनालयांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा माहिती अधिकारी श्री. खडसे म्हणाले, सामाजिक एकोपा, समानता निर्माण होण्यासाठी माणूस वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होणे आवश्यक आहे. वाचनामुळे माणूस सुसंस्कृत बनतो. त्यामुळे सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी प्रथम वाचन संस्कृती वृद्धिंगत होणे आवश्यक आहे. समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे. यासोबतच गावोगावी असलेल्या सार्वजनिक वाचनालयांनी सुध्दा विविध उपक्रमांचे आयोजन करून ग्रंथांची ओळख लोकांना करून दिली पाहिजे. ग्रंथांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भविष्यातील पिढी चांगली घडवायची असेल तर आजचा प्रत्येक विद्यार्थी ग्रंथ वाचनाकडे वळणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ग्रंथोत्सव आयोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांचे प्रमुख व सदस्य यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ग्रंथदिंडीचे यशस्वी नियोजन करणारे राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल संतोष काळमुंदळे व त्यांच्या सहकाऱ्यांचाही यावेळी प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नथ्थूजी चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार संतोष खंडारकर यांनी मानले.

तत्पूर्वी रिसोड-मालेगाव मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनीही ग्रंथोत्सवास सदिच्छापर भेट देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. सकाळीच्या सत्रात ग्रंथोत्सवात‘ग्रंथ वाचन आणि विकास’ या विषयावरील परिसंवाद झाला. ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात कवी मोहन शिरसाट, शेख युसुफ यांनी आपले विचार व्यक्त केले. सायंकाळी ‘वाह वाह क्या बात’ फेम  हास्यकवी मनोज मद्रासी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्य वाचन कार्यक्रमात प्रा. फारुख जमन, डॉ. विजय काळे, प्रा. चव्हाण यांनी काव्य वाचन केले. ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या ग्रंथ दालनामध्ये नागपूर येथील शासकीय ग्रंथ भांडाराच्या दलानासह इतर नामांकित प्रकाशन संस्थांचे व विक्रेत्यांनी आपली दालने याठिकाणी उभारली होती. जिल्ह्यातील ग्रंथप्रेमींनी या दालनांना भेट देवून ग्रंथ खरेदी केली.