पालचौक ते गायत्री मंदिर रस्त्यासाठी नप उपाध्यक्षाचे आंदोलन

0
13

गोंदिया,दि.25ः- शहरातील वर्दळ असलेल्या पाल चौक ते गायत्री मंदिर पर्यंतच्या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. या मागणीला घेऊन नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा व नगरसेवक बेबी अग्रवाल यांनी  २४ डिसेंबर रोजी वसंत लिथो प्रेस चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यात नगरसेवक दिलीप गोपलानी यांच्यासह परिसरातील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्य. अभियंता यांनी घेत ३0 डिसेंबरपासून या रस्त्याचा कामाला सुरुवात होणार असल्याचे लेखी आश्‍वासन दिले. त्यातही सदर रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे काम नगरपरिषदेला करावयाचे आहे.परंतु नगरपरिष अतिक्रमण हटाव मोहिम करण्यात अपयशी ठरल्याने नगरपरिषेच्या मालमत्तेवरच काही दुकानदारांनी अतिक्रमण सुरु केल्यानेही रस्ते छोटे होऊ लागले तर इमारती अतिक्रमणधारकाच्या ताब्यात येऊ लागल्या आहेत.
पाल चौक ते गायत्री मंदिर या दरम्यान दोन मोठे महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांसह इतर मोठय़ा वाहनांची मोठी गर्दी असते. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. छोटे-मोठे अपघात हे नित्याचेच झाले आहे. दरम्यान, दोन वर्षाआधी या रस्ता बांधकाम मंजूर करण्यात आले होते. तसेच माहितीनुसार निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सदर कंत्राटदार असाटी यांच्याकडे होते. मात्र, कामास सुरूवात झाली नव्हती. उलट सुधारित प्रशासकीय मान्यता या कामाला मिळाली. प्रशासकीय यंत्रणेकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे प्रशासनाचा गलथान कारभारामुळे कंटाळून शेवटी सत्ता पक्षातील नगर परिषदेचे उपाध्यक्ष शिव शर्मा व त्या भागातील नगरसेवक धर्मेश (बेबी) अग्रवाल यांनी रस्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले. दोन तासानंतर याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्य. अभियंता मिथीलेश चौव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन ३0 डिसेंबरपासून सदर कामाला सुरुवात करणार असल्याचे लेखी आश्‍वासन दिले. आश्‍वासन मिळाल्यावर आंदोलनकर्त्यांद्वारे आंदोलन समाप्त करण्यात आले.