मराठी भाषेची कौशल्य आत्मसात करावी-प्रा. गजानन वाघ

0
114

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

वाशिम, दि. ०5 :  मराठी भाषा ही आपली माय आहे. तिचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. वाचन, भाषण आणि श्रवण ही मराठी भाषेची कौशल्य आत्मसात केली पाहिजे, तरच मराठी भाषा सुदृढ होईल, असे विचार प्रा. गजानन वाघ यांनी व्यक्त केले.जिल्हा न्यायालयातील सभागृहात ४ जानेवारी रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीज्ञ मंडळ वाशिम यांच्या संयुक्तवतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने आयोजित ‘मराठी भाषा आणि आपण’ या विषयावर व्याख्यान देतांना प्रा. वाघ बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य न्यायदंडाधिकारी स्वाती फुलबांधे तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. ए.आर. देशपांडे यांची उपस्थिती होती.

प्रा. वाघ बोलतांना पुढे म्हणाले, शरीर जसे आपण कमावतो तशी आपली मराठी आपल्याला सौष्ठव करता आली पाहिजे, भाषेचे उपयोजन करता आले पाहिजे. लेखन काम हे भाषिक कौशल्याचे काम आहे. आपल्याकडे असलेल्या अनुभव साठ्याचे उपयोजन साहित्य लेखनासाठी झाले पाहिजे. वाचन हे दांडग असले पाहिजे. अवांतर वाचन केले पाहिजे. वाचनातून आपण घडत असतो. आज मोठ्या प्रमाणात मराठी साहित्य वाचनासाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात बाबाराव मुसळे, ना. च. कांबळे, विलास अंभोरे, अशोक मानकर यासारखे साहित्य क्षेत्रात योगदान देणारे व नावलौकीक असणारे व्यक्तीमत्व आपल्या जिल्हयाला लाभल्याचे सांगून प्रा. वाघ म्हणाले, सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या काळात आपणाला तणावमुक्त राहायचे असेल तर वाचन केले पाहिजे. भरपूर लिहिण्यासाठी भरपूर वाचन केले पाहिजे. काव्याग्रहसारखी वाशिम येथून चालणारी साहित्याची चळवळ ही सर्वदूर गेली पाहिजे. साहित्यिकांच्या ज्ञानाचा फायदा आपण घेतला पाहिजे. दैनंदिन व्यवहारात जेवढा जास्त मराठीचा वापर करता येईल तेवढा करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

न्या. श्रीमती फुलबांधे म्हणाल्या, मराठी भाषा संवर्धन पंधरवडयामुळे मराठी भाषेचे ज्ञानार्जन होण्यास मदत होईल. आपण मराठी भाषेशी कटिबध्द असले पाहिजे. मराठी भाषेला पुढे नेण्याची आणि तिला समृध्द करण्याची जबाबदारी आपली असल्याचे त्या म्हणाल्या.ॲड. देशपांडे म्हणाले, आपण आपल्या मायबोलीपासून दूर जात असल्यामुळे आपल्याला मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी हा पंधरवडा साजरा करावा लागतो. मराठी जर समृध्द करायची असेल तर आपल्याला मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे. मराठी चित्रपट, मराठी नाटक पाहणे आवश्यक असून मराठी पुस्तके वाचने देखील आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला न्या. एस. बी. पराते, न्या. एस. पी. शिंदे, न्या. पी. एच. नेरकर, न्या. डॉ. श्रीमती यु. टी. मुसळे, न्या. श्रीमती के. बी. गीते, न्या. एस. पी. बुंदे, न्या. एम. एस. पोळ, न्या. एस. पी. वानखडे, जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड अजयकुमार बेरिया, उपाध्यक्ष ॲड. अमरसिंह रेशवाल, सचिव ॲड. प्रसाद ढवळे, कोषाध्यक्ष श्रध्दा अग्रवाल, ॲड. श्रीमती सी.एन. मवाळ, ॲड. एस.बी. शेवलकर, ॲड. एस. बी. लबडे, ॲड. सचिन खराटे यांच्यासह विधीज्ञ मंडळी, पक्षकार, न्यायालयातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार ॲड. गीतांजली गवळी यांनी मानले.