व्यावसायिक प्रशिक्षण देवून बंदीजणांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न-कारागृह अधीक्षक पाडुळे

0
40

वाशिम, दि. ०7 : कारागृहात दाखल झालेल्या बंदींना त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु करता यावा. त्यामाध्यमातून स्वतःची समाजात नवीन ओळख निर्माण करून आपले पुढील आयुष्य सुखाने जगात यावे, यासाठी जिल्हा कारागृहातील बंदींना व्यावसायिक प्रशिक्षण देवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न कारागृह विभागामार्फत करण्यात येत असल्याचे जिल्हा कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे यांनी सांगितले. भारतीय स्टेट बँकेच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) व जिल्हा कारागृह यांच्यावतीने आज आयोजित दहा दिवसीय शेळी संगोपन प्रशिक्षणाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आरसेटीचे संचालक रघुनाथ निपाने, तज्ज्ञ प्रशिक्षक संतोष खासबागे,  जेलर सतीश हिरेकर, अशोक पंडित, ‘आरसेटी’चे सहाय्यक आशिष राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पाडुळे म्हणाले, बंदीजणांमध्ये सुधारणा व पुनर्वसन करण्यासाठी यापूर्वीही जिल्हा उद्योग केंद्रांच्या माध्यमातून एक दिवसीय प्रशिक्षण घेवून बंदींजणांना विविध व्यवसायांची माहिती देण्यात आली होती. मात्र त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळणे सुध्दा आवश्यक होते. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार आरसेटीने हे प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शविली. कारागृहामध्ये असलेले बहुतांशी बंदीजन हे ग्रामीण भागातील असल्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी संगोपन प्रशिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा बंदीजणांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

श्री. खडसे म्हणाले, कारागृहातील बहुतांशी कैदी हे ग्रामीण भागातील आहेत. त्यांना कारागृहातून बाहेर पडल्यानंतर शेळी पालनाचा व्यवसाय करणे सहज शक्य आहे. त्यामुळे प्रशिक्षणातून त्यांना शेळी संगोपनाचे तंत्रशुद्ध माहिती मिळेल. त्याचबरोबर हे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र सुध्दा आरसेटीमार्फत दिले जाणार असल्याने त्यांना बँकांमार्फत आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी मदत होईल. प्रधानमंत्री मुद्रा योजनेसारख्या योजनांचा लाभ घेवून बंदीजणांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करता येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रशिक्षणाचा लाभ घेवून आदर्श बकरी पालक बनण्याचे आवाहनही त्यांनी बंदीजणांना केले.श्रीमती बजाज म्हणाल्या, कोणताही व्यवसाय करावयाचा असेल तर त्यासाठी आवश्यक कौशल्य आपल्यामध्ये विकसित करणे गरजेचे असते. विविध व्यावसायिक प्रशिक्षणातून अशी कौशल्ये विकसित होतात. या कौशल्यांच्या आधारे आपल्याला व्यावसायिक क्षेत्रात अपेक्षित प्रगती साधता येते. त्यामुळे शेळी संगोपन अथवा आपल्या आवडीच्या इतर क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर बंदीजणांनी स्वतःचा व्यवसाय उभारावा.

श्री. निपाने म्हणाले, भारतीय स्टेट बँकेकडून चालविल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अर्थात आरसेटीकडून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील बेरोजगारांना सुमारे ७० विविध व्यवसायांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण निवासी स्वरूपाचे असते. त्याचा लाभ घेवून बेरोजगारांना स्वतःचा रोजगार सुरु करता येतो. बंदीजणांनी सुद्धा आपल्या कुटुंबातील युवक-युवतींना अशाप्रकारच्या व्यावसायिक प्रशिक्षणाचा लाभ घेण्याबाबत सांगावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.सर्वप्रथम आशिष राऊत यांनी प्रास्ताविकामध्ये आरसेटीमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच जिल्हा कारागृह येथे दहा दिवस चालणाऱ्या शेळी संगोपन प्रशिक्षणाची रूपरेषा सांगितली.

बंदीजणांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, याकरिता जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची ‘वाट समतेची…’ ही घडीपुस्तिका व लोकराज्य मासिकांच्या विविध विशेषांकाच्या प्रती जिल्हा माहिती अधिकारी श्री. खडसे यांनी जिल्हा कारागृह अधीक्षक श्री. पाडुळे यांच्याकडे सुपूर्द केल्या. कार्यक्रमाचे संचालन श्री. राऊत यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जेलर श्री. हिरेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरसेटीचे योगेश चव्हाण, महेंद्र समरक, जिल्हा कारागृहाचे सुभेदार श्रीराम मालटे, कॉन्स्टेबल पराजी सोन्नर, स्वप्नील हांडे व भारती सावरकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी बंदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.