अल्पसंख्याक कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवा-ज. मो. अभ्यंकर

0
16
????????????????????????????????????

वाशिम, दि. ०८ :  केंद्र शासन व राज्य शासन अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवीत आहे. या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीला मिळेल, याची दक्षता सर्व संबंधित विभागांनी घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी दिल्या. येथील शासकीय विश्रामगृह येथे आज आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, नितीन मोहुर्ले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक श्री. गोहाड, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित कुलकर्णी यांच्यासह  संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. अभ्यंकर म्हणाले, अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री १५ कलमी कार्यक्रमासोबतच्या अल्पसंख्याक कल्याणाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. अनेकदा या योजनांविषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती नसते. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजनांची माहिती संबंधित घटकांपर्यंत पोहोचवावी.  विशेषतः शिक्षण विषयक सवलती, कौशल्य विकासाच्या योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील सर्व पात्र व्यक्तींना दिला जावा. तसेच शासनाच्या इतरही योजनांचा लाभ देताना सुध्दा अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींचा प्राधान्याने विचार करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी त्यांनी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अल्पसंख्याक बहुल शाळांसाठी मंजूर वर्ग खोल्यांचे बांधकाम, शिक्षकांच्या समस्या, घरकुल योजना, कौशल्य विकास, उच्च शिक्षण आदी विषयांचा आढावा घेतला. तसेच संबंधित विभागांना आवश्यक सूचना केल्या.

अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती, संस्थांशी चर्चा

श्री. अभ्यंकर यांनी जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तीं, अल्पसंख्याक समाजातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालक यांची बैठक घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांची निवेदने स्वीकारली. यावेळी काही  अल्पसंख्याक महिलांचे बचत गटांच्या महिलांनीही त्यांची भेट घेवून आपल्या मागण्या सादर केल्या. तसेच मदरशांच्या समस्याही जाणून घेतल्या.