पाणी व स्वच्छता जीवनासाठी अत्यावश्यक

0
11

गोंदिया : आजच्या घडीला शासनाकडून सर्वाधिक खर्च आरोग्य व स्वच्छता या बाबींवर केला जात आहे. तरीही समाजात मानवी आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाणी व स्वच्छता ही मानवी जीवनाची दोन चाके असून ही दोन्ही चाके मानवी आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित असणे गरजेचे आहे. त्यासाठी सुजाण नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जि.प. उपाध्यक्ष मदन पटले यांनी केले.
भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभागाकडून १६ मार्चपासून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व स्वच्छता जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन पटले मार्गदर्शन करीत होते.
उद््घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गावडे यांच्या हस्ते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आर.एल. पुराम, सहायक खंडविकास अधिकारी एन.के. भांडारकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण व दीपप्रज्वलित करून विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी सीईओ गावडे यांनी गावातील पाणी व स्वच्छतेसंदर्भात ग्रामसेवक व सरपंचांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याने त्यांनी याकडे जबाबदारीने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम यांनी वैयक्तिक स्वच्छता व शुद्ध पाणी यासंदर्भात करुन गोंदिया जिल्हा परिषदेच्यावतीने सुरु असलेल्या दत्तक ग्राम योजनेवर प्रकाश टाकून जिल्हा स्वच्छ होण्यास पदाधिकार्‍यांनी घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा असल्याचे सांगितले.
गोंदियाचे सहायक खंडविकास अधिकारी भांडारकर यांनी यावेळी प्रास्ताविक केले तर माहिती व शिक्षण संवाद तज्ज्ञ राजेश उखळकर यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
संचालन समाजशास्त्र तज्ज्ञ दिशा मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे सर्व सल्लागार व गोंदिया पं.स. गटसंसाधन कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.