हजारो युवकांना मिळणार रोजगाराच्या संधी; नवेगावबांध येथे आज रोजगार व मार्गदर्शन मेळावा

0
44
अर्जुनी मोर,दि.१६ःः-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १७ फेब्रुवारी रोजी नवेगावबांध येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोजगार व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे उपस्थित होते. ना. बडोले यांनी पुढे सांगितले की, गोंदिया जिल्हा हा आदिवासीबहूल व नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील असल्याने या जिल्ह्यात उद्योगही कमीच आहेत. अशा वेळी येथील युवकांना रोजगाराच्या संधीच कमी आहे. त्यामुळे ना. राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून या रोजगार व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात तज्ञ मंडळीव्दारे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याचे वैशिष्ट म्हणजे युवकांना त्यांच्या कौशल्य, शैक्षणिक पात्रता व आवड या तिनही बाबींचा योग्य समन्वय साधून नौकरी व रोजगाराची संधी देण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांसोबत मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद आदी ठिकाणी काम करण्याची संधी युवकांना मिळणार आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी युवकांनी सोबत ३ फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्र व बायोडाटा सोबत आणावा. या मेळाव्याला विधानसभा क्षेत्रातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.