जिल्हाधिकारी कार्यालयावर माळी समाजाचा मोर्चा

0
15

भंडारा,दि.02ः-शहरातील भगतसिंग वॉर्डातील हटविण्यात आलेल्या म. ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची पुर्नस्थापना करण्यात यावी तसेच त्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी माळी समाज बांधवांच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे, याच मागणीसाठी मागील आठवड्यात माजी नगरसेवक अरुण भेदे यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. तरीसुद्धा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने आज हा मोर्चा काढण्यात आला.
भगतसिंग वॉर्डातील नवीन टाकळी येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमण व अवैध बांधकाम तात्काळ काढण्यात यावे, या जागेवर शासकीय खर्चाने ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची पुर्नस्थापना करावी, त्यांचा अपमान व द्वेष करणारी नगर परिषद बरखास्त करावी, न. प. मुख्याधिकार्‍यांना निलंबित करावे, महसूल अधिकार्‍यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून सेवेतून बडतर्फ करावे, महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतर% पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, शासकीय जागेची गैर कायदेशिर खरेदी- विक्री करणार्‍या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, पालकमंत्र्यांच्या कार्यक्र मात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे अरूण भेदे यांचेविरुद्ध दाखल गुन्हा मागे घेण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. शासनाने ताबडतोब कारवाई न केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
आंदोलनात अ. भा. माळी महासंघ, समता परिषद, भारिप बहुजन महासंघ, ओबीसी क्रांती मोर्चा, खासदार मधुकर कुकडे, कॉ. हिवराज उके, सुकराम देशकर, डॉ. श्रीकांत भुसारी, संतोष भेदे, अरूण भेदे, दीपक गजभिये, संजय मते, राजेश सुर्यवंशी, प्रशांत सुर्यवंशी, भाष्कर सुखदेवे, प्रकाश देशकर, उर्मिला आगाशे, गौतम कावळे, नितीन तुमाने, अजय तांबे, भारत वासनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.