जातीय दंगा नियंत्रणाची पोलीस दलाकडून रंगीत तालीम 

0
51

वाशिम, दि. १५ :  लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाशिम शहर अथवा परिसरात जातीय तेढ निर्माण झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दलामार्फत केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची रंगीत तालीम १४ मार्च रोजी वाशिम शहरातील पाटणी चौक येथे घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ. पवन बन्सोड सहभागी झाले होते.

यावेळी वाशिम जिल्हा पोलीस दलातील वरुण वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, आरसीपी, क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी), पोलीस पथक, डॉग युनिट, अग्निशमन दल, होमगार्ड्स असे एकूण ७ वाहने, १० पोलीस अधिकारी, १ नायब तहसीलदार आणि ११५ पोलीस कर्मचारी यांनी दंगा नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या कार्यवाहीचे प्रात्यक्षिक सादर केले.   लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सज्ज असून जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले.

वाशिम शहरात पोलीस प्रशासनामार्फत कोंबिंग ऑपरेशन

 लोकसभा निवडणूक निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी वाशिम शहरात पोलीस प्रशासनामार्फत गुन्हेगारांची शोध मोहीम व कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. १५ मार्च रोजी सकाळी ५ वाजलेपासून शहरातील कलम ३०७ व ३०२ सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची शोध मोहीम व कोंबिंग ऑपरेशन सुरु करण्यात आली होते.

यावेळी शहरातील सौदागरपुरा येथे राहणाऱ्या बबलू खान उर्फ शेख फिरोज शेख इस्माईल यांच्या घरी तलवारी व इतर घातक शस्त्रे असल्याबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बन्सोड, वाशिमचे ठाणेदार बी. आर. गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे व पोलीस कर्मचारी यांनी बबलू खान उर्फ शेख फिरोज शेख इस्माईल याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात ३ तलवारी, १ सुरा, २ चाकू, ७ लोखंडी रॉड व १ कुकरी अशी धारदार शस्त्रे मिळून आली.  कारवाई टाळण्याच्या उद्देशाने बबलू खान याने जप्त हत्यारामधून अचानकपणे कुकरी उचलून पोलीस कर्मचारी ज्ञानदेव मात्रे यांच्या मानेवर मारण्याचा प्रयत्न केला असता मात्रे यांनी स्वतःला वाचविण्यासाठी कुकरी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये श्री. मात्रे यांच्या  हाताला जखम झाली. यावेळी ठाणेदार श्री. गीते यांनी बबलू खान याला जागीच पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्यातील धारदार शस्त्राने स्वतःच्या मांडीवर वार करून स्वतःला जखमी करून त्याचा आळ पोलीस प्रशासनावर घेवून वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बबलू खान उर्फ शेख फिरोज शेख इस्माईल व त्यचा सहकारी पप्पी उर्फ अजहर अहमद याच्यावर अप. नं. १४६/१९ कलम ३०७, ३०९, ३५३, ३३२, १५३ भादविसह कलम ४, २५ आर्म अॅक्टसह कलम १३५ मपोका गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांनी कळविले आहे.यावेळी पुसद नाका येथील प्रतिष्ठाने बंद करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शेख राजीक उर्फ लल्ला व २० ते २५ व्यक्तींवर कलम ३३६, ४२७, १४३, ५०४, ५०६ भादवि, कलम १३५ मपोका, कलम ७ क्रिमिनल लॉ अमेंड्मेंटअॅक्टप्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु आहे. शहरामध्ये विविध १६ ठिकाणी फिक्स पॉईंटम ८ वाहनासह पेट्रोलिंग पथकासह १० पोलीस अधिकारी, ८२ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शहरात व परिसरात संपूर्ण शांतता आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व आपले दैनंदिन कामकाज सुरु ठेवावे. काही अनुचित प्रकार आढळल्यास वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या ०७२५२-२३२१०० या दूरध्वनी क्रमांकावर समर्पक साधावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक श्री. चव्हाण यांनी केले आहे.