विधानसभा मतदारसंघनिहाय खर्चाचा अहवाल दररोज सादर करावा- नाकीडी सृजन कुमार

0
11

गोंदिया दि.१८.: लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विविध वृत्तपत्रांतून येणाऱ्या पेडन्यूज, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून येणाऱ्या जाहिराती आणि समाजमाध्यमांवर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष राहणार आहे. जिल्ह्यात निवडणूकीच्या काळात अवैध दारु विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. विधानसभा मतदारसंघनिहाय खर्चाचा अहवाल दररोज सादर करावा. असे निर्देश भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे निवडणूक खर्च निरिक्षक नाकीडी सृजन कुमार यांनी दिले.
आज १८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत श्री.सृजन कुमार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.सृजनकुमार म्हणाले, जिल्ह्यात निवडणूकीच्या काळात जिथे तपासणी नाके लावलेले आहेत त्या नाक्यांवर अत्यंत बारकाईने तपासणी केली जावी. पैसा व दारु जिल्ह्यात येणारच नाही याकडे विशेष लक्ष दयावे. काही राज्यात मागील निवडणूकीत ॲम्बुलन्स आणि पोलीस गाडीचा वापर पैसा आणि दारुचा पुरवठा करण्यासाठी झाल्याची बाब निवडणूक आयोगाच्या लक्षात आल्याने याबाबत जिल्ह्यात दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले. परवाना प्राप्त मद्य विक्रीच्या दुकानात मद्याचा साठा ‍िकती आहे याची दररोज तपासणी करावी असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे म्हणाल्या, विविध राजकीय पक्षांचे मतदान आणि मतमोजणी प्रतिनिधी यांच्या भोजनाचा खर्च देखील पक्षाच्या निवडणूक खर्चात समावेश करावा. कोणत्या राजकीय पक्षांची किती वाहने प्रचारात आहेत याकडे निवडणूक यंत्रणेने लक्ष दयावे. त्यांचे होर्डींग किती आहेत तसेच जाहिर सभा असल्यास तेथे पक्षाचा की उमेदवाराचा प्रचार झाला यावर बारीक नजर असावी असेही त्या म्हणाल्या.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे, सहायक राज्य कर आयुक्त पी.एन.मालठाणे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जि.प.उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आरती नागरे, जि.प.लेखाधिकारी शत्रुघ्न मसराम, स्थानिक लेखा शाखेचे श्री.मांढरे, लेखाधिकारी श्री.वासनिक यांची उपस्थिती होती.