उमेदवारांनी गुन्हेगारी, फौजदारी प्रकरणांची माहिती वृत्तपत्र व टि.व्ही. वरुन प्रसिध्द करावी- निवडणूक आयोग

0
15

Ø  सर्व उमेदवारांना बंधनकारक

भंडारा,दि. 22 :- भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज सादर करणाऱ्या सर्व उमेदवारांना गुन्हेगारी व फौजदारी प्रकरणांची माहिती निवडणूक लढवित असलेल्या भागात सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रात व प्रसिध्द टि.व्ही चॅनलवर प्रसिध्द करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या 25 सप्टेंबर 2018 च्या निकालानुसार आयोगाने हे निर्देश दिले असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी या निर्णयाचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना भारत निवडणूक आयोगानी दिल्या आहेत.

निवडणूक आयोगाच्या 20 ऑक्टोंबर 2018 च्या पत्रानुसार उमेदवारावर गुन्हेगारी व फौजदारी प्रकरण असल्यास वृत्तपत्र वा दुरदर्शनवरुन अर्ज मागे घेण्याच्या  तारखेनंतर  आणि मतदानाच्या दोन दिवसाअगोदर किमान 3 वेळा वृत्तपत्र व टि.व्ही. चॅनेलवरुन जाहिरात प्रसिध्द करणे आवश्यक आहे. जाहिरात प्रसिध्द केल्यानंतर आयोगाने दिलेल्या विहित नमुना-4(उमेदवारासाठी ) आणि नमुना-5  (राजकीय पक्षासाठी ) मध्ये जाहिरात प्रसिध्दीची माहिती भरुन निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करणे बंधनकारक आहे. अशा प्रकारची माहिती सादर न केल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित उमेदवारावर कार्यवाही केली जाऊ शकते.

टि.व्ही. चॅनेलवर देण्यात येणारी जाहिरात ही सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत प्रसिध्द होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ज्या भागात उमेदवार निवडणूक लढत आहे, त्या भागातील प्रचलित भाषेत किंवा इंग्रजी भाषेत जाहिरातीचा मजकूर असावा. या मजकूरात दाखल असलेल्या एफआयआरचा नंबर त्याची सद्याची स्थिती याबाबत माहिती असणे बंधनकारक आहे.जाहिरातीचा मजकूर स्टँडर्ड साईज फाँट मध्ये असावा. टि.व्ही. वरील जाहिरात ही 7 सेकंदापेक्षा कमी आकाराची नसावी. ज्या उमेदवारावर गुन्हेगार, फौजदारी प्रकरण नाहीत. त्यांनी अशा प्रकारची जाहिरात देण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्या उमेदवारावर गुन्हेगारी, फौजदारी प्रकरण प्रलंबित आहेत, त्यांना जाहिरात देणे बंधनकारक असणार आहे.