सुकडी जंगलात वणवा लावताना एकाला पकडले

0
17

चिचगड(सुभाष सोनवाने)दि.29 :देवरी तालुक्यातील चिचगड वनक्षेत्रातील सुकडी भाग-१ मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचारी हे गस्तीवर असताना आरोपी माधोराव सिताराम कोवे रा.रामगड (लाखांदूर) याला सदर ठिकाणी आग लावताना आढळताच त्याला वनअधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
सध्या ग्रामीण भागामध्ये मोहफुल वेचण्याच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. मोहफुले गोळा करण्यासाठी बरेच जण झाडाखालील पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावतात. याच आगीला बरेचदा वणव्याचे स्वरुप प्राप्त होते. त्यामुळे मौल्यवान संपत्तीचे नुकसान होते. शिवाय यामुळे वन्यप्राण्यांना सुध्दा धोका होतो. प्रदूषणावर आळा घालण्याचे काम झाडांच्या माध्यमातून होत आहे.
निसर्गाच्या आल्हाददायक पोषण वातावरणाशी एकरुप होण्यासाठी वनांचे संरक्षण करण्यासाठी एक जागरुक नागरिक म्हणून प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. फेब्रुवारी ते जून या कालावधीत जंगलात वणवा लागण्याच्या घटना घडतात. या काळात वनसंपत्तीचे आगीपासून नुकसान होऊ न देण्याची दक्षता घेणे वन विभाग नागरिकांची सुध्दा जबाबदारी आहे. वणवा लागलेला दिसल्यास त्याची माहिती संयुक्त वन व्यवस्थापन समिती, वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल यांना लगेच सूचित करावे.जंगलात हेतूपुरस्पर आग लावतांना आढळल्यास सहा महिन्यांपर्यंत कठोर कारावासाची शिक्षा किंवा आर्थिक दंड किंवा न्यायालय जो निर्णय देईल त्याप्रमाणे नुकसान भरपाई वसूल करण्याची तरतूद आहे.