युवा वर्गाने मोठ्या संख्येने मतदान करुन इतरांना प्रोत्साहित करावे- डॉ.कादंबरी बलकवडे

0
16

गोंदिया दि. २९ :  : युवा वर्ग हे देशाचे भविष्य आहे. निवडणूक प्रक्रियेत युवा वर्गाने सक्रीय होवून आपले योगदान दयावे. येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये युवा वर्गाने मोठ्या संख्येने मतदान करुन इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात २८ मार्च रोजी मतदार जागृती अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यातील २२ महाविद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांशी चर्चा करतांना जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे बोलत होत्या. यावेळी स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.बलकवडे म्हणाल्या, या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत एकही मतदार हा मतदानापासून वंचित राहू नये यासाठी युवावर्गाने पुढाकार घ्यावा. घरातील १८ वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्यास प्रोत्साहित करावे. ज्येष्ठ असलेल्या आजी-आजोबांना तसेच शेजारच्या व्यक्ती, मित्र मंडळींना तसेच दिव्यांग व्यक्तींना मतदानाचे महत्व पटवून देवून त्यांना मतदान केंद्रावर मतदानासाठी येण्यास प्रोत्साहित करावे. तेथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या माध्यमातून मतदार जागृतीबाबत विविध उपक्रम विद्यार्थ्यांनी राबवावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.दयानिधी म्हणाले, मतदार जागृती अभियाना दरम्यान महाविद्यालयामध्ये येवून मतदान प्रक्रिया कशाप्रकारे राबविण्यात येते याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येईल. महाविद्यालयातील युवक-युवतींनी मतदान जागृती अभियाना दरम्यान सामाजिक बांधीलकी जोपासून काम करावे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदार मतदान करण्यास पुढे येतील असे ते म्हणाले.
यावेळी जिल्ह्यातील २२ महाविद्यालयातील २७ विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार जागृती उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग देणार असल्याचे सांगितले.