गडचिरोली जिल्हा परिषदेचा ८ कोटी ३० लाखांचा अर्थसंकल्प सादर

0
13

गडचिरोली -जिल्हा परिषदेचा २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जिल्हा परिषद सभागृहात आयोजित विशेष सभेत सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे वित्त सभापती अतुल गण्यारपवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विजय मुळीक, मुख्य लेखा अधिकारी श्री.राऊत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती उपस्थित होते. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर वित्त सभापती अतुल गण्यारपवार यांनी पत्रकारांना विस्तृत माहिती दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण व आरोग्य विभागाच्या निधीत कपात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एकूण ८ कोटी ३० लाखांच्या या अर्थसंकल्पात शिक्षण विभागाचा निधी ७८ लाखांवरुन कमी करुन तो ६१ लाख करण्यात आला. बांधकाम विभागासाठी १ कोटी १६ लाख ९५ हजारांची तरतूद करण्यात आली. मात्र, सिंचन, कृषी, पशुसंवर्धन व समाजकल्याण विभागाच्या निधीत भरमसाठ वाढ करण्यात आली. सिंचन विभागासाठी ८५ कोटी, कृषी विभागासाठी १ कोटी २४ लाख ८९ हजार, पशुसंवर्धन विभागासाठी ७० लाख, तर समाजकल्याण विभागासाठी १ कोटी ८१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. ग्रामपंचायती सक्षम झाल्याने पंचायत विभागाचा निधी २५ लाखांवरुन कमी करुन तो अवघ्या १० लाखांवर आणण्यात आला. तसेच आरोग्य विभागाच्या ७० लाखांच्या निधीत कपात करुन हा निधी ३४ लाख करण्यात आला. ग्रामीण पाणीपुरवठा विभागालाही झुकते माप देण्यात आले, अशी माहिती अतुल गण्यारपवार यांनी दिली.