चंद्रपूरचे प्रदूषणकारी चार कारखाने बंद होणार

0
3

मुंबई-विविध नियमांचा भंग करणार्‍या राज्यातील २८ कारखान्यांची बँक गॅरंटी राज्य सरकारने जप्त केली असून, चंद्रपूर जिल्ह्यातील चार प्रदूषणकारी कंपन्या बंद करण्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगांकडून होत असलेल्या प्रदूषणासंदर्भात मांडलेल्या एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना कदम यांनी सदर घोषणा केली. ते म्हणाले, चंद्रपूरमध्ये आपण स्वतः दोनदा पाहणी केली आहे. सुरुवातीला प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणार्‍या २८ कारखान्यांची बँक गॅरंटी सरकारने जप्त केली, अशी माहिती त्यांनी दिली. परंतु, ही कारवाई पुरेशी नाही. कडक कारवाई करायला हवी, असा आग्रह शोभाताई फडणवीस तसेच माणिकराव ठाकरे यांनी धरला. त्यानंतर कदम यांनी प्रदूषणाला कारणीभूत ठरणार्‍या वरोरा येथील कर्नाटक एम्टा, बील्ट ग्राफिक्स पेपर प्रॉडक्ट्‌स लि., वर्धा पॉवर कॉर्पोरेशन आणि अवंथा पॉवर ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या चार कंपन्या बंद करण्यात येतील, अशी घोषणा केली.
जिल्ह्यात हवेतील प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रो स्टॅटिक प्रेसिपिटेटर, बॅग फिल्टर यासारखी आधुनिक यंत्रणा, धुरांड्यातून धुळकणांचे उत्सर्जनासाठी रिकव्हरी बॉयलर आणि औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया संयंत्र बसविले असून, प्रक्रियाकृत सांडपाण्याचा पुनर्वापर केला जात असल्याचे, त्याचबरोबर नियमांचे पालन न करणार्‍या उद्योगांवर तातडीने कारवाई करून त्यांची बँक हमी जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले. तर, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असून खासगी ऊर्जाप्रकल्प चालू ठेवायचे की नाही याचाही विचार केला जाईल, असेही कदम म्हणाले.