गोंदिया जिल्ह्यातील भाजप-शिवसेना नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
6

मुंबई- गोंदिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आदिवासी नेते व जनवादी परिषदेचे प्रमुख सहसराम कोरोटे आणि शिवसेनेच्या नेत्या जिल्हा परिषद सदस्या किरणताई कांबळे यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,आमदार गोपालदास अग्रवाल,माजी आमदार रामरतन राऊत यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.श्री अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते श्री राधाकृष्ण विखे पाटील, आ.श्री गोपालदाल अग्रवाल, माजी आमदार श्री रामरतनबापू राऊत आणि गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम कटरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी भवन येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला.सहसराम कोरोटे भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष होते व त्यांनी गतवर्षी आमगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती तर श्रीमती किरणताई कांबळे विद्यमान जि.प. सदस्य असून, मागील वर्षी त्या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार होत्या. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या केंद्रातील व राज्यातील सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केल्याने आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले.
देशात आणि राज्यात भाजप व शिवसेनेचे सरकार असताना या पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे, हे सरकारप्रती जनतेतील कमालीच्या नाराजीचे प्रतिक असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.श्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. पूर्व विदर्भातील प्रमुख पीक असलेल्या धानाला काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात अधिकाधिक भाव देण्यात आला. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतक-यांना भरीव मदत देण्यात आली. परंतु, विद्यमान सरकारच्या काळात धान उत्पादकांच्या हाती केवळ निराशाच आल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणा-या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. विद्यमान सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या व निर्णयांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी आणि उपाध्यक्ष श्री राहुलजी गांधी यांनी संघर्ष सुरू केला असून, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी या लढाईत मोठ्या संख्येने उतरावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी विद्यमान पं.स. सदस्य व माजी सभापती गणेश हरिणखेडे, माजी सरपंच सुरेंद्र कोटांगले, सरपंच सोहन चौरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जगदेव शेंडे, माजी सरपंच दिलिप तावाडे, परमेश्वर बिसेन, हंसराज जोशी, शाम देशमुख, रामेश्वर नागदेवे, गणेश हुकरे,हितेश डोंगरे,जागेश्वर नागपूरे,सुखराम तुमराम, डॉ. धनराज मेहर,तोलिराम रहांगडाले,देवेंद्र बन्सोड,पूरण मेहर आदींनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला.