मतदानाचा हक्क प्रत्येकांनी बजवावा

0
17

भंडारा,दि.10 : मतदान आपला अधिकार तर आहेच त्याही पेक्षा कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य प्रत्येकाने बजवावे, असे आवाहन निवडणूक निरिक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांनी केले.मतदार जागृतीसाठी भंडारा शहरात आज रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी जिल्हा परिषद भंडारा येथून शालेय विद्यार्थ्यांची मतदार जागृती रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीस मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. रॅलीत सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भुसारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसुंगे, मंजुषा ठवकर, स्वीपच्या नोडल अधिकारी कावेरी नाखले, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके, शिक्षणाधिकारी लक्ष्मण पाच्छापूरे उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत अधिकाधिकांनी मतदान करावे, यासाठी जिल्ह्यात मोठया प्रमाणात मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. मंगळवारला छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकूल येथे शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून पथनाट्यातून बालमनावर मतदानाचे संस्कार करुन त्याद्वारे त्यांच्या पालकांस व परिसरातील नागरिकास मतदान करण्याचा संदेश दिला. यावेळी तुमची सुविधा आमची जबाबदारी या घोष वाक्याद्वारे मतदारामध्ये जनजागृती करण्यात आली.
रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमात असर फाऊंडेशन भंडारा यांनी पथनाट्य सादर करुन मतदानाचे महत्व, संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकारामुळे घडणारे भविष्य, पोस्टकार्ड, मतदारातील मतदानविषयी अज्ञान याबाबीवर प्रकाश टाकून बालमनावर संस्कार केले.मुलामुलींना आपल्या आई-वडिल व परिसरातील नागरिकांस जाऊन याविषयी महत्व व नक्की मतदान करा,असे पटवून देण्याविषयी आवाहन करण्यात आले.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात शिक्षकांनी घरोघरी जावून मतदानासाठी मतदारास प्रोत्साहित करावे. त्यामुळे निश्चितच मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल, असा विश्वास सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला. मतदान जागृती रॅली जिल्हा परिषद, राजीव गांधी चौक, मिस्किन टॅक, मुस्लीम लॉयब्ररी चौक, बस स्थानक, त्रीमूर्ती चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकूल येथे रॅलीची सांगता झाली.संचालन मुकूंद ठवकर यांनी केले. आभार अभियान शिक्षणाधिकारी काटोलकर यांनी मानले.