आदिवासी भिवकुंडीवस्तीत सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेला सुरवात

0
18
मोर्शी,दि.10ः-तालुक्यातील सतपुडा पर्वत रांगेच्या कुशीतील दुर्गम आदिवासी वस्ती असलेल्या भिवकुंडी गाव यावर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला सुरवात झाली.संपूर्ण महाराष्ट्रभर आजच्या दिवसाची जय्यत तयारी रात्रीपासूनच सुरू झाली होती.त्यात मोर्शी तालुक्यातील काही गावांनी सकाळी पहाटे सूर्याच्या पहिल्या किरणाने स्पर्धचा श्रीगणेशा करायचा निर्णय घेतला. सातपुडा रांगेत डोंगरमाथ्याच्या पायथ्यावर वसलेले दुर्गम आदिवासी वस्ती असलेल्या भिवकुंडीने पारंपरिक आदिवासी परंपरेनुसार स्पर्धेची आगळ्यावेगळ्या पध्दतीने सुरवात केली. जनावरांच्या कातळीपासून तयार झालेले पारंपरिक ढोलाच्या एक विशिष्ट लयबद्ध तालावर गावात प्रभातफेरी काढून संबंध गावकऱ्यांच्या एकजुटीने श्रमदानाच्या ठिकाणापर्यंत नाचत वाजत गाजत संपूर्ण गावकरी पोचले. महिला मोरपंखाच्या साहाय्याने तयार केलेले कलाकृती हातात घेऊन श्रमदानाच्या ठिकाणापर्यंत आदिवासी पारंपारिक गोंडी नृत्य सादर करत गावकऱ्यांचे मनोबल वाढवत होते.
पाणी फाउंडेशन च्या प्रशिक्षणाकरिता आलेल्या गावकऱ्यांच्या हस्ते कामाचे उदघाटन करून कामाला सुरुवात करण्यात आली. आणि बघता बघता 1तासाभरात तब्बल ९०.५ घनमीटर एवढे काम करत cct चे काम पूर्ण केले. गावाला साथ लाभली ते मोर्शी तालुक्यातील दिग्गज व्यावसायिक उद्योजक नवीनकुमार पेठे यांची. त्यांनी आपल्या संपूर्ण मित्रपरिवराच्या सोबत उपस्थित राहून गावकाऱ्यांसोबत श्रमदान करत गावकर्यांना एक मोठा आत्मविश्वास दिला. आणि स्पर्धेला आवश्यक ती मदत करण्याचे वचन दिले. पाणी फाउंडेशनची तालुका टीम सुद्धा गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावत श्रमदानात उतरली होती.