यात्रा काळात पोहरादेवी येथील वाहतूक मार्गात बदल;मद्यविक्री बंद

0
27

वाशिम, दि. १० : मानोरा तालुक्यातील पोहरादेवी व उमरी खुर्द येथे येथे भरणाऱ्या बंजारा समाजाच्या यात्रेनिमित्त राज्यातून तसेच राज्याबाहेरून भाविक मोठ्या संख्येने खाजगी व इतर वाहनाने येतात. ही वाहने गावात किंवा मंदिर परिसरात उभी (पार्किंग) केल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे १० ते १४ एप्रिल २०१९ या कालावधीत पोहरादेवी येथील वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.

पोहरादेवी येथे होत यात्रेनिमित्त १२ ते १४ एप्रिल २०१९ या कालावधीत पोहरादेवी गावामधील सर्व देशी व विदेशी किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचे,तसेच रामनवमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनुक्रमे १३ व १४ एप्रिल २०१९ रोजी संपूर्ण जिल्ह्यातील सर्व देशी व विदेशी किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुसदकडून येणाऱ्या सर्व वाहनांना सिंगत फाट्याकडून बायपासमार्गे मंदिराकडे व पोहरादेवी गावात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पुसदमार्गे येणारी वाहने बसस्थानक मार्गे दिग्रसकडे जाऊ शकतील किंवा उजव्या बाजूला मोकळ्या शेतात वाहनांचे पार्किंग करणे सोयीचे राहील. पुसद व धानोराकडून येणाऱ्या सर्व वाहनांना बजरंगबली मंदिराजवळून मंदिर रस्त्याने गावात जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुसदकडून येणारी वाहने बस स्थानकमार्गे दिग्रसकडे जाणे सोयीचे होईल. दिग्रस, मानोरा, धानोराकडून येणाऱ्या वाहनांना प्रवेद्वाराचे कमानी मार्गे जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे दिग्रस, मानोरा कडून येणारी वाहने बस स्थानककडून पुसद व धानोराकडे जाऊ शकतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.