विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

0
19

लाखांदूर,दि.17ः-कृषी पंप सुरू करण्यासाठी गेल्यानंतर ट्रान्सफार्मरवरून वीज पुरवठा बंद असल्याचे दिसून आल्याने विजेचा तार जोडण्याहेतू ट्रान्सफार्मरवर चढलेल्या शेतकर्‍याला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१५) मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील बोथली येथे घडली.
प्रदीप बंडू कुथे (३५) रा. बोथली असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. लाखांदुर तालुक्यात बहुतांश प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली असून कृषी पंपांकरीता रात्री १२.३0 वाजतापासून वीज पुरवठा केला जातो. रविवारपासून रात्रपाळी चालू झाल्याने सोमवारला रात्री १२ वाजता सुमारास प्रदीप हा वडिलांसोबत शेतावर पंप सुरू करण्यासाठी गेला होता. दरम्यान सोमवारला सायंकाळी वादळ सुटल्यामुळे बहुतांश ठिकाणी विजेची तार तुटली होती. बोथली येथील कृषी पंपाच्या ट्रान्सफार्मरमध्ये सुद्धा वादळामुळे बिघाड आल्याने प्रदीप ट्रान्सफार्मरवर चढला होता. तो ट्रान्सफार्मरवर चढला आणि विजेला स्पर्श होताच खाली कोसळला. हाताला व पायाला गंभीर जखम झाल्याने प्रदीपला लाखांदुर येथील ग्रामिण रूग्नालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. दोन वर्षाआधी प्रदीपच्या चुलत भावाला व काकाला विजेच्या शॉक लागला होता. यात काका बचावला तर चुलत भावाचा मृत्यू झाला होता.
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कृषीपंपाला रात्री १२ वाजता विज पुरवठा केला जातो. यामुळे शेतकर्‍यांना रात्री शेतावर फेर्‍या माराव्या लागतात. त्यामुळे कधी साप, जंगली प्राणी यांचा हल्ला होत असतो. तर विजेत बिघाड आल्यास विजेचा शॉक बसत असतो. प्रदीपच्या मृत्यूला संबंधित प्रशासनास दोषी धरले जात आहे.त्याच्यापश्‍चात पत्नी व दोन वर्षीय मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी दिघोरी/मोठी पोलीस स्टेशनला आकस्मित मुत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गावंडे हे करीत आहेत.