रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

0
28

सडक-अर्जुनी,दि.0८ : तालुक्यात सुरू असलेल्या रेती चोरीकडे महसूल विभागाचे लक्ष नसल्याच्या बातम्या वारंवार प्रकाशित होत होत्या. त्याची दखल घेत महसूल विभाग खळबळून जागा झाला असून सोमवारी (दि.६) दोन तर मंगळवारी (दि.७) दोन अशाप्रकारे एकूण चार ट्रॅक्टर सोमवारी पहाटे ६ वाजता चुलबंद नदीच्या पात्रातून अवैध रित्या रेती चोरी करून वाहतूक करीत असताना तहसीलदार उषा चौधरी यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागाच्या पथकाने चुलबंद नदीच्या कोदामेडी गावाजवळील घोगरा घाट परिसरात कारवाई केली. यात वाहन क्र मांक ङ्क्त एमएच ३५- जी ९०७६ तसेच एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला. चालकांकडे वाहतूक परवाना आढळून न आल्याने वाहन जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. त्यांच्यावर महाराष्ट्र अधिनियम १९६६ कलम ४८ (७) व महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक १२ जानेवारी २०१८ अन्वये एक लाख १५ हजार ४०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.
त्याचप्रकारे मंगळवारी (दि.७) पहाटे ६.३० वाजतादरम्यान हरेश लांजेवार वय (२६, रा.पळसगाव-राका) व कांतमन बैज कुरसुंगे (२९.रा. बानटोला-चिखली) यांना पळसगाव-राका मार्गावर अवैध रित्या बिना क्रमाकाच्या ट्रॅक्टरमध्ये रेतीची वाहतूक करताना पोलिसांनी पकडले. दोन्ही ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले असून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. सध्या महाराष्ट्रातील संपूर्ण रेतीघाटांच्या लिलावावर स्थगिती आली आहे. मात्र तालुक्यातून रात्रीला अवाधरित्या रेती चोरी केली जात असल्याचे बोलले जात आहे. रेती चोरी मुळे जवळील उमरझरी नाल्याचे आता गटार झाल्याचे दिसत आहे. रेती माफियांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रेमी करीत आहेत.