नक्षली हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्चमधून शांततेचा संदेश

0
12

गडचिरोली,दि.16: कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे गेल्या १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले. माओवाद्याच्या या हिंसक भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ १५ मे रोजी बुधवारला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातून मुख्य मार्गाने कॅन्डल मार्च काढण्यात आला. जानकी शहीद सोसायटी तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, डॉ.मोहीतकुमार गर्ग, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व जवान उपस्थित होते. या कँडल मार्चमधून शांततेचा संदेश देत नक्षली कृत्याचा निषेध नोंदविण्यात आला.
१ मे रोजी कुरखेडा येथे शिघ्रकृती दलाचे जवान कर्तव्यावर जात असताना जांभुळखेडा-पुराडा मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून आणला.हिंसक माओवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस विभाग व विविध सामाजिक संघटनांनी या कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते. यावेळी प्रामुख्याने सायकल स्नेही मंडळ व शहीद पोलीस जवानांच्या महिला संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते.या मार्चदरम्यान पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह इतर पोलीस जवान व महिलांनी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात मेणबत्त्या लावून शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.यात पोलीस अधिकाऱ्यांसह जवान, विविध संघटनांचे प्रतिनिधी व महिला सहभागी झाल्या होत्या