माओवाद्यांच्या बंदला गावकऱ्यांचा तीव्र विरोध-जाळले बॅनर

0
17

गडचिरोली,दि.१९: माओवाद्यांनी आज पुकारलेल्या बंदला गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावकऱ्यांनी तीव्र विरोध करीत माओवाद्यांनी लावलेले बॅनर जाळून बंदचा निषेध नोंदविला आहे.एटापल्ली जवळील गुरुपल्ली व भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे माओवाद्यांनी लावलेले बॅनर काढून नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन काढून त्याची होळी केली.तसेच तुम्ही आमच्यावर बंद लादू शकत नाहीत.लोकशाहीने आम्हांला दिलेल्या आमच्या सन्मानाने जगण्याचा हक्क तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही.तुम्ही दुटप्पी भूमिका घेऊन आदिवासी समाजाची फसवणूक करत असल्याची टिका माओवाद्यांवर केली आहे.
माओवाद्यांनी ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९’च्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचे केलेले आवाहन गडचिरोलीतील दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनतेने मोडीत काढत स्वतःहून घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला आपला पाठींबा असल्याचे दाखवून दिले होते.यामुळेच महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त मतदानाची टक्केवारी ही गडचिरोली जिल्ह्यात नोंदली गेली होती.या घटनांमुळे नक्षलवाद्यांनी आपले अस्तिव दाखविण्यासाठी व समाजात भिती निर्माण करण्यासाठी आज रोजी गडचिरोली बंद चे आवाहन जनतेला केले होते.परंतु माओवाद्यांचे खरे रूप जनतेला समजले आहे.यामुळेच या बंदला देखील गावकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

माओवाद्यांनी बंदच्या नावाखाली एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली ते करेम फाट्याच्या दरम्यान झाडे पाडून,बॅनर लावून रोडची वाहने अडविण्याचा प्रयत्न केला.परंतु याला गावकऱ्यांनी स्वतः विरोध दर्शवित रस्त्यात पाडलेल्या झाडांना बाजूला करून नक्षल्यानी लावलेल्या बॅनर्स ची होळी केली.यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी माओवाद्यविरोधी घोषणा दिल्या.तसेच माओवादी बंदच्या नावाखाली सामान्य आदिवासी जनतेला संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करत असल्याचे सांगत आपण माओवाद्यांच्या बंदच्या विरोधात असल्याचे गावकऱ्यांनी स्पष्ट केले.यावेळी गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांच्या या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत नक्षलवाद्य विरोधी घोषणा दिल्या.