गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन-कृषि विभागाचे आवाहान

0
25

वाशिम, दि. २१ : कापूस पिकावर होणारा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार कृषि विभागामार्फत विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रमा खंडित करण्यासाठी पूर्व हंगामी कपाशीची लागवड टाळावी व कपाशी पिकांमध्ये आंतरपीक घ्यावे. कपाशीची लागवड करताना कमी कालावधीच्या कपाशीच्या वाणाची निवड करावी. कपाशी हे पिक ४० ते ४५ दिवसाचे झाल्यावर पिकांमध्ये सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. कपाशी हे पिक पाती व बोंड अवस्थेत असल्यास १० दिवसाच्या अंतराने एकरी ३ ट्रायकोकार्ड (प्रत्येकी २० या प्रमाणे ६० पट्ट्या) ७ ते ८ वेळा कापूस पिकात लावावी. कपाशीच्या पती बोंड अवस्थेत ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. नियमित सर्वेक्षण करून किडीचे आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडताच शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करावी. कापूस खरेदी केंद्र, कापूस साठवणूक केंद्र, गोदाम व सर्व जिनिंग प्रोसेसिंग साईटवर लाईट ट्रॅप व फेरोमन ट्रॅप्सचा वापर करावा. जेणे करून या किडीचे पतंग या सापळ्यामध्ये अडकून नष्ट करणे सोयीचे होईल.

कापसामध्ये आढळून येणाऱ्या किडीच्या सर्व अवस्थाचा नायनाट करण्यासाठी कापूस जिनिंग युनिटमधील चाळणीतील निघणाऱ्या अळ्या, कोष व इतर अवस्था गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. जिनिंग मिल आणि मार्केट यार्डमध्ये कच्च्या कापसाची जास्त कालावधीसाठी साठवणूक केल्याने ते येणाऱ्या कापसाच्या पिकांसाठी गुलाबी बोंड अळीचे स्रोतस्थान म्हणून काम करते. त्यामुळे कच्च्या कापसाची वेळीच प्रक्रिया करणे आवश्यक आहे. शिफारशीत नसलेले विविध कीटकनाशके, संजीवके, अन्नद्रव्ये यांचे एकत्रित मिश्रण करून फवारणी करू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.