केंद्र शासनामार्फत होणाऱ्या सातव्या आर्थिक गणनेचे प्रशिक्षण संपन्न

0
11

गोंदिया,दि.११. : केंद्र शासनामार्फत यावर्षी सातवी आर्थिक गणना करण्यात येत आहे. आर्थिक गणनेच्या माहितीचा वापर नियोजनासाठी केला जातो. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्राच्या सहभागासाठी आकडेवारी व त्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराची माहिती मिळते. याबाबतचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच पार पडले. प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी मृणालिनी भूत, प्रणोती बुलकुंडे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी नवनाथ चव्हाण व सी.एस.सी.-एस.पी.यु.चे निलेश कुंभारे उपस्थित होते.
प्रशिक्षणास सर्व मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले. उपस्थित २०० प्रगणक व पर्यवेक्षकांना सी.एस.सी.-एस.पी.यु.च्या अधिकाऱ्यांनी गणनेच्या अनुषंगाने संकल्पना, माहिती नोंदणी, माहिती वैद्यतीकरण याबाबत सविस्तर माहिती दिली. सी.एस.सी.-एस.पी.यु. संस्थेचे प्रगणक घरोघरी भेटी देवून छोटे-मोठे घरगुती उद्योग, आस्थापना, संस्था, उपक्रमांना भेटी देवून माहिती गोळा करणार आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकास आवश्यक माहिती उपलब्ध करुन देवून या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी नवनाथ चव्हाण यांनी केले आहे.