तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगसाधना आवश्यक – डॉ.कादंबरी बलकवडे

0
92

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
गोंदिया, दि.२१.: योगसाधना ही भारताने संपूर्ण जगाला आणि मानवतावादाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगास अनन्यसाधारण महत्व आहे. सुदृढ शरीर, मन आणि निरोगी आरोग्यासाठी योग हा उत्तम पर्याय असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने योगसाधना करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
आज २१ जून रोजी इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात डॉ.बलकवडे बोलत होत्या. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, आजची आपली जीवनशैली पूर्णपणे बदलेली आहे. कामाच्या वेळा, खाण्याच्या सवयी, कामाचा ताण, झोपेची कमतरता या सर्वांमुळे आज प्रत्येकाला तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये योगसाधनेचा समावेश करणे आवश्यक आहे. योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारिरीक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ राहते. नियमीत योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. योगामुळे मनशांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होवून एकाग्रता सुध्दा वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगसाधना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्ट ऑफ लिव्हींगचे मुख्य प्रशिक्षक विकास देशपांडे यांनी नगर योग उत्सव समिती तर्फे उपस्थितांकडून वृक्षासन, अर्ध वृक्षासन, पूर्ण वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, दंडासन, वज्रासन, शसकासन, उत्तन मंडूकासन, उत्तान उर्ध्वमुस्कासन, उत्तान पादासन, मरिचासन, मक्रासन, भूजंगासन, शलभासन, सेतू बंधासन, जगदीस्पादासन, अर्धांगासन, पवन मुक्तासन, शवासन, नाडी शोधन प्राणायम, शितल प्राणायम, भ्रामरी प्राणायम, पदमासन, अर्ध पदमासन व सुकासन इत्यादी योगासनाचे उपस्थितांकडून प्रात्यक्षिके करवून घेतली.
कार्यक्रमास माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.हाश्मी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, लेखाधिकारी एल.एच.बावीस्कर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांचेसह पतंजली योग समिती, योग मित्र मंडळ, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, अखिल विश्व गायत्री परिवार, ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, नेहरु युवा केंद्र, रामकृष्ण सत्संग मंडळ, श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस इन्स्टीट्यूट आदी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन नागेश गौतम यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ.प्रशांत कटरे यांनी मानले. यावेळी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक, नागरिक, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.