भंडारा जिल्ह्यातील पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा

0
17

भंडारा,दि.24ः- लोकसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या दणदणीत विजयानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिध्द केले. लाखनी तालुक्यातील पालांदूर जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या बिंदू महेश कोचे तर ब्रम्ही गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतक राजेश डोंगरे विजयी झाले. तब्बल २७ वर्षानंतर भाजपाच्या ताब्यातील पालांदूर जिल्हा परिषद गट काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतला.
जिल्ह्यातील दोन जिल्हा परिषद गटांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी मतमोजणी झाली. पालांदूर जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या बिंदू कोचे आणि भाजपाच्या रजनी भारत नंदागवळी यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत कोचे यांना ५८४१ तर नंदागवळी यांना ५७०१ मते मिळाली. काँग्रेसच्या कोचे १४० मतांनी विजयी झाल्या. या निवडणुकीत नोटाला १६० मते मिळाली. पालांदूर जिल्हा परिषद गट गत २७ वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात होता. जिल्हा परिषद सदस्या वर्षा रामटेके यांचे वर्षभरापूर्वी अपघात निधन झाले. त्यामुळे याठिकाणी पोटनिवडणुक घेण्यात आली.
काँग्रेसने ही निवडणूक माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विनायक बुरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत, दामाजी खंडाईत, विजय कापसे यांच्या नेतृत्वात लढली. लोकसभा निवडणुकीत पालांदूर जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपा उमेदवाराला २३०० मतांची आघाडी मिळाली होती. मात्र अवघ्या महिन्याभरानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने विजय संपादीत केला.
पवनी तालुक्यातील ब्रम्ही जिल्हा परिषद गटातून राष्टÑवादीचे चेतक राजेश डोंगरे आणि भाजपचे द्रोपद चरणदास धारगावे यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत चेतक डोंगरे यांना ७०८७ तर द्रोपद धारगावे यांना ३४९७ मते मिळाली. ३५९९ मतांनी डोंगरे यांचा विजय झाला. या निवडणुकीत नोटाला १३३ मते पडली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणुक घेण्यात आली. चेतक डोंगरे हे राजेश डोंगरे यांचे पुत्र आहे. या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाने द्रोपद धारगावे यांना रिंगणात उतरविले होते. मात्र राष्ट्रवादीने ही जागा आपल्या ताब्यात ठेवली.
लाखांदूर नगर पंचायतीत भाजपने बाजी मारली
लाखांदूर नगर पंचायतीचा वॉर्ड क्र. १६ साठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सोफीया अंजूम रिजवान पठाण विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या मिनाक्षी अशोक पारधी यांचा ६८ मतानी पराभव केला. तसेच लाखांदूर तालुक्यातील पाचगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत रविंद्र देशमुख यांनी योगेश ठाकरे यांचा ६५ मतांनी पराभव केला.
पालांदूरच्या सरपंचपदी रामटेके
पालांदूर चौ. ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या लढतीत अपक्ष उमेदवार पंकज रामटेके विजयी झाले. त्यांना १६२३ मते मिळाली. तर केशव कुंभरे यांना १०५८ मते मिळाली. मुळचे भाजपचे असणारे रामटेके यांनी युवा स्वाभिमानी संघटनेच्या ताकतीवर निवडणूक लढवून भाजप समर्पित उमेदवार कुंभरे यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक ४ च्या निवडणूक अंतकला कापसे या २९४ मते घेत विजयी झाल्या. तर प्रतिस्पर्धी नलू मेश्राम यांना २७४ मते मिळाली. दहा मते नोटाला मिळाली. प्रभाग क्र. ५ च्या निवडणुकीत अश्विन थेर ४७७ मते घेत विजयी झाले. तर नामदेव नंदनवार यांना २४७ मते मिळाली. सिंदपुरी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकी प्रभाग २ मधून गितेश टेंभुर्णे १५८ मते घेत विजयी झाले तर भीमराव टेंभुर्णे यांना १२७ मते मिळाली.