ओबीसींचे आरक्षण विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ववत होणार-खा.नेते

0
11

गडचिरोली,दि.02ः- जिल्ह्यातील ओबीसींचे १९ टक्क्यावरून ६ टक्क्यावर आणलेले आरक्षण येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ववत होणार असून, नोकरभरतीतील ओबीसींवरील अन्याय दूर होणार असल्याची माहिती खा.अशोक नेते यांनी आज (दि. १) सर्कीट हॉऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम, सुधाकर येनगंधलवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत खा.अशोक नेते यांनी सांगितले की, २२ वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्क्यावर आणण्यात आले. त्यानंतर राज्यपालांनी काढलेल्या अधिसूचनेनंतर वर्ग ३ व ४ च्या नोकरभरतीत शंभर टक्के अनुसूचित प्रवर्गातील उमेदवारांची भरती होत होती. हा विषय आपण सातत्याने सरकार दरबारी लावून धरला. त्यानंतर १३ ऑगस्ट २0१८ च्या परिपत्रकान्वये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली. या समितीने आपला अहवाल राज्याच्या आदिवासी सल्लागार समितीकडे सुपूर्द केला असून, समितीने तो राज्यपालांकडे पाठविला आहे. त्यामुळे लवकरच ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के होऊन नोकरभरतीत या प्रवगार्ला प्राधान्य मिळेल, असे खा.नेते यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार गडचिरोली येथे प्रचारासाठी आले असता आपण बेरोजगारी दूर करण्यासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करुन मुनगंटीवार यांनी चालू पावसाळी अधिवेशनात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी ५00 कोटींची तरतूद मंजूर केली आहे. त्यापैकी १५0 कोटी रुपयांची तरतूद झाली असून, उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने मिळणार असल्याची माहिती खा.अशोक नेते यांनी दिली.
वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या निर्मितीतील सर्व अडथळे दूर झाले असून, लवकरच या कामाला सुरुवात होईल. तसेच हा मार्ग तेलंगणातील मंचेरियल व आदिलाबादपयर्ंत नेण्यात येणार असून, त्याचे सर्वेक्षणही सुरु झाल्याचे खा.नेते यांनी सांगितले.