गोंदिया/गडचिरोली,दि.04ः– राज्य सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी ३ जुलै रोजी राज्यभर ‘लक्षवेधी दिन’ पाळला. मंत्रालयासह राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने निदर्शने करुन जिल्हाधिकारी मार्फेत मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी चर्चेच्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता अंशदायी पेन्शन योजना रद्द करण्याच्या संघटनेच्या मुळ मागणीला बगल देऊन १९ जानेवारी २0१९ रोजी अभ्यास समितीची घोषणा केली. ही समिती अंशदायी पेन्शन योजनेतील फक्त त्रृटीचा विचार करणार असल्याने शासनाच्या या विसंगत धोरणाला विरोध करणे अनिवार्य झाले आहे. जानेवारी २0१९ पासूनचा महागाई भत्ता अद्यापही दिलेला नाही. बक्षी समितीचा दुसरा खंड सादर झालेला नाही. कर्मचार्यांना विविध भत्ते लागू करण्यासाठी चालढकल केली जात आहे. प्रलंबित सर्व मागण्या टप्याटप्याने सोडविण्याचे अभिवचन ज्या शासनकर्त्यांनी दिले होते, त्यासंदर्भात अत्यंत कुर्म गतीने कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी आज सर्व राज्य सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी राज्यभर लक्षवेधी दिन पाळला.
मंत्रालय व राज्यात इतरत्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतप्त कर्मचार्यांनी निदर्शने केली. यानंतरही प्रलंबित मागण्या संदर्भात शासनाचे उदासीन धोरण चालूच राहीले तर राज्य समन्वय समितीच्यावतीने २0 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी लाक्षणीक संप पुकारण्यात येणार असल्याचा इशारा दिला.बुधवारला गोंदिया व गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. गोंदियातील आंदोलनामध्ये राज्य कर्मचारी महासंघाचे समन्वयक लिलाधर पाथोडे,प्रल्हाद शहारे,कमलेश बिसेन,अजय खरवडे,संतोष तुरकर,आशिष रामटेके,एल.आर.ठाकरे,एल.यु.खोब्रागडे,मनोज मानकर,लिलाधर तिबुडे यांच्यासह इतर महसुल व जि.पचे कर्मचारी होते,तर गडचिरोली येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल चडगुलवार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लतीफ पठान, सरचिटणीस किशोर सोनटक्के, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, प्रदिप भांडेकर, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, दामोदर पटले, चंदू प्रधान, धनंजय दुमपट्टिवार, डॉ. विजय ऊईके, रघुनाथ भांडेकर, एस.के.बावणे, मायाताई बाळराजे, छाया मानकर, नवघडे, फिरोज लांजेवार व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.




