घोटीचे सरपंच जितेंद्र डोंगरे पायउतार

0
17

गोरेगाव दि.११ःतालुक्यातील घोटी येथील सरपंच जितेंद्र तुलाराम डोंगरे यांच्यावर उपसरपंचसह आठ सदस्यांनी अविश्‍वास दर्शविल्याने बुधवार, १0 जुलै रोजी घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत अविश्‍वास प्रस्ताव पारित करण्यात आल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले.
घोटी येथे ग्रामपंचायतमध्ये ११ सदस्य संख्या आहे. मागील साडेतीन वषार्पूर्वी जितेंद्र डोंगरे यांची सरपंच पदासाठी बहुमताने निवड करण्यात आली होती. मात्र सरपंच डोंगरे यांनी आपल्या कार्यकाळात केलेली कामे ही इतर सदस्यांना विश्‍वासात न घेता केली तर अनेक निर्णयदेखील स्वमताने घेतल्याच्या ठपका सदस्यांनी लावला आहे. दरम्यान, उपसरपंच संगीता कटरे, ग्रापं सदस्या नंदा रामटेके, प्रीती कतलाम, इंदू गिरिपुंजे, प्रमिला बिसेन, तेजेश्‍वरी टेकाम, सविता गौतम, हेमराज बोंडे या आठ सदस्यांनी ४ जुलै रोजी गोरेगावचे तहसीलदारांकडे सरपंच डोंगरे यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव सादर केला होता. त्यावर तहसीलदार शेखर पुनसे यांनी बुधवार १0 जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय घोटी येथे विशेष सभा घेतली. यामध्ये जितेंद्र डोंगरे यांच्या बाजूने ३ मते पडली त्यामुळे २ तृतीयांशने अविश्‍वास प्रस्ताव पारित करण्यात आला. ज्यामुळे सरपंच जितेंद्र डोंगरे यांना सरपंच पदावरून पाय उतार करण्यात आले. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार शेखर पुनसे होते. यावेळी सहकारी म्हणून नायब तहसीलदार एन. एम. वेदी, ग्रामविस्तार अधिकारी राणे यांनी काम पाहिले.