पारधी समाजाला योजनांचा लाभ देवून विश्वास निर्माण करा – किशोर तिवारी

0
19
????????????????????????????????????

वाशिमदि. १५ : पारधी समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदलला पाहिजे. ते सुद्धा आपल्या समाजाचा एक भाग आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. पारधी समाजाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करावा, असे मत कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आज १५ जुलै रोजी जिल्ह्यातील पारधी बेड्यावरील विविध समस्यांचा आढावा घेतांना श्री. तिवारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. फारुकी, पारधी समाजाचे प्रतिनिधी मतीन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. तिवारी म्हणाले, जिल्ह्यातील फासे पारधी समाजाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आदिवासी विकास विभागाने १५ दिवसांत करावा. पारधी समाजाच्या विकासासाठी विविध यंत्रणांकडे असलेल्या संकल्पना जिल्हाधिकारी यांना द्याव्यात. त्यानुसार योजना राबविण्यासाठी निधी लागल्यास उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यातील एकही फासे पारधी, कोलाम कुटुंब अंत्योदय योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी पुरवठा विभागाने पुढाकार घेवून त्यांना धान्य उपलब्ध करून द्यावे. पारधी हा समाज सुद्धा आपल्या समाजाचा घटक आहे. त्यांना चोर समजून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करू नये. जिल्ह्यातील पारधी आणि कोलाम समाज जर घरकुलापासून वंचित असेल तर एकात्मिक आदिवासी विकास विभागाने त्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पारधी समाज किती वर्षांपासून शेती करीत आहे. तसेच ती जमीन अतिक्रमित असेल तर त्याबाबतची माहिती महसूल विभागाने एकत्रित करावी, असे सांगून श्री. तिवारी म्हणाले, भविष्यात ती जमीन त्यांना त्यांच्या नावावर कशाप्रकारे करून देता येईल, याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवता येईल. आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या फासे पारधी समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळतात की नाही याकडे लक्ष देवून या मुलांना नामांकित शाळेत शिक्षण कसे देता येईल, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाने नियोजन करावे. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुद्धा या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात यावे, असे श्री. तिवारी यावेळी म्हणाले.जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, फासे पारधी समाजातील शिक्षित मुलांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा, त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम वाशिम पोलीस अधीक्षक हे करतील. फासे पारधी समाजाच्या विविध समस्या निश्चित सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फासे पारधी समाजाच्या विकासासाठी मागीलवर्षी जिल्ह्यासाठी ५५ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली होती, तर यावर्षी ७० लक्ष रुपये तरतूद केली आहे. या निधीतून त्यांना घरकुल आणि त्यांच्या मुलांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित करणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी सांगितले.जिल्ह्यातील सर्व फासे पारधी बांधवांना पुरवठा विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी सांगितले.यावेळी पारधी समाजाचे प्रतिनिधी मतीन भोसले यांनी जिल्ह्यातील पारधी बांधवांच्या समस्या मांडल्या. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची तसेच जिल्ह्यातील काही फासे पारधी समाज बांधवांची उपस्थिती होती.

 पिक कर्ज वाटपाचा आढावा

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज १५ जुलै रोजी नियोजन भवन येथील सभागृहात पिक कर्ज वाटपाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, भारतीय स्टेट बँकचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील मनचंदा, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. कुलकर्णी, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांची प्रमुख उपस्थिती होती.पिक कर्ज वाटपाचा आढावा घेतांना श्री. तिवारी म्हणाले, बँकांनी नवीन कर्जदाराला पिक कर्ज उपलब्ध करून द्यावे. बोगस पिक कर्ज वाटप होणार नाही, याकडे बँकांनी लक्ष द्यावे. प्रत्येक बँकेत शाखानिहाय कर्ज वाटपासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा. काही बँकांनी अल्प पिक कर्ज वाटप केले आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे बँकांना दिलेले पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करता येईल, याकडे लक्ष द्यावे. बँकांनी यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे त्यांनी सांगितले. जुने पिक कर्ज भरून शेतकऱ्यांनी बँकांना सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. तिवारी यांनी यावेळी केले.

श्री. मोडक म्हणाले, पिक कर्ज वाटपासाठी बँकेच्या शाखानिहाय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येतील. दर सोमवारी पिक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात येतो. ज्या शेतकऱ्यांना बँकांनी पिक कर्जाची मागणी करून सुद्धा पिक कर्ज दिलेले नाही, त्यांना बँकांना तातडीने पिक कर्ज वाटपाचे निर्देश देण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.श्री. निनावकर यांनी १२ जुलैपर्यंत जिल्ह्यातील बँकांमार्फत करण्यात आलेल्या पिक कर्ज वाटपाची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात खरीप हंगामात १५३० कोटी रुपये पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. आतापर्यंत ३६ हजार ४६ शेतकऱ्यांना २९० कोटी ८१ लक्ष रुपयांचे म्हणजेच १८.९७ टक्के पिक कर्जाचे वाटप झाले आहे.