नवीन मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

0
10

वाशिम, दि. १९ : १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १५ जुलै २०१९ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १५ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येणार आहे तसेच मतदार यादीतील दुरुस्तीसुधारणाही करता येणार आहे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज झालेल्या राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत केले.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, नायब तहसीलदार श्री. पाटील यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी २० व २१ जुलै आणि २७ व २८ जुलै २०१९ रोजी या शासकीय सुट्टीच्यादिवशी विशेष मोहीम राबविली जाणार आहे.  यादिवशी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर उपस्थित राहून नवीन मतदार नोंदणी,नावातील किंवा पत्त्यामधील चुकांची दुरुस्ती यासह दुबार नावेमयत मतदारांची नावे वगळणे आदीसाठीचे अर्ज स्वीकारण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. इतर दिवशीही हे अर्ज मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा  तहसीलदार कार्यालयात सादर करता येतील. या अर्जांचे नमुने संबंधित मतदान केंद्र स्तरीय अधिकारीतहसीलदार कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.

यापूर्वी आपले नाव मतदार यादीत असले तरी अथवा यापूर्वी आपण मतदान केले असले तरी प्रत्येक मतदाराने आपले नाव प्रारूप मतदार यादीत आहे का, हे तपासावे. प्रारूप मतदार यादी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे व तहसीलदार कार्यालयात उपलब्ध आहे. या मतदार यादीत नाव नसल्यास नवीन अर्ज भरून देवून आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करावा.  जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पात्र मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले.