26.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ हैद्राबादेतील ओबीसी महाधिवेशनाला जिल्ह्यातून पाचशेच्या वर कार्यकर्ते जाणार

हैद्राबादेतील ओबीसी महाधिवेशनाला जिल्ह्यातून पाचशेच्या वर कार्यकर्ते जाणार

0
32

गडचिरोली,दि.20 : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चौथे महाअधिवेशन ७ ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथील इनडोर स्टेडियम सरुरनगर येथे आयोजित करण्यात आले असून या महाअधिवेशनाला गडचिरोली जिल्ह्यातून पाचशेच्या वर ओबीसी कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी दिली.शहरातील जिजाऊ चौकातील अमोल भवनात या संदर्भात आढावा व नियोजन सभा पार पडली.सभेला दादाजी चापले, प्राचार्य के. वाय. वाघरे, विनायक बांदुरकर, प्रा. देवानंद कामडी, सुरेश भांडेकर, पांडुरंग घोटेकर, गोविंदराव बानबले, भास्कर नरुले, एस. टी. विधाते, पी. पी. म्हस्के, पांडुरंग नागापुरे, चंद्रकांत शिवनकर, दादाजी चुधरी, के. एन. लडके, मनोज निंबार्ते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून नागपूर, दिल्ली, मुंबई येथे महाअधिवेशन घेण्यात आले आहे. तसेच विविध मोर्चे, आंदोलन करून ओबीसी समाजाच्या प्रश्न व समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जात असून ते पूर्ण करण्यास सरकारला भाग पाडले जात आहे. त्यामुळेच नॉन-क्रिमिलेअरची मर्यादा ६ लाखावरून ८ लाख, राष्ट्रीय ओबीसी आयोगास संविधानिक दर्जा, प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी वसतिगृह, ओबीसी विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंत शिष्यवृत्ती, परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, सारथी, बार्टीच्या धर्तीवर ओबीसींसाठी स्वायत्ता संस्था, ओबीसी वित्त व विकास महामंडळाची थेट कर्ज योजना २५ हजाराहून १ लाख करण्यात महासंघाला यश आले आहे. या धर्तीवर हैद्राबाद येथे होणाऱ्या चौथ्या महाअधिवेशनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून आकडेवारी घोषित करावी, केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे तत्काळ गठन करावे, ओबीसी, शेतकरी, शेतमजुरांना ६० वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी, क्रिमिलेअरची घटनाबाह्य अट रद्द करावी, भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची मर्यादा अडीच लाख करून ती १०० टक्के देण्यात यावी, महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, एससी, एसटी प्रमाणे ओबीसींना स्वाधार योजना सुरू करावी या प्रमुख मागण्यांच्या निराकरणासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाअधिवेशन घेण्यात येत आहे.या महाअधिवेशनाला गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आढावा बैठकीत करण्यात आले. .