शहरातील ५१५ घरकुल बांधकामांना मंजुरी-नगराध्यक्ष इंगळे

0
14

गोंदिया,दि.22 : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गोरगरीब नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न साकारले जात आहे. यापूर्वीच शासनाने शहरातील ५१५ घरकुल बांधकामांना मंजुरी दिली होती. त्यानंतर आता यासाठी ५ कोटी १५ लक्ष रूपयांचा निधी नगर परिषदेला उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शहरातील घरकुल बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरात पंतप्रधान घरकुल योजनेचे काम जोमात सुरू आहे. प्रत्येक गरजवंताला स्वत:चे घरकूल देण्याची योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुरु आहे. गोंदिया नगर पालिकेने या योजनेकडे जातीने लक्ष घालून जास्तीत जास्त घरकूल बांधून देण्याचा निश्‍चय केला. गोंदिया शहरात साडेसात हजार घरकूल बांधण्याचे लक्ष्य आहे. त्याकरिता संपूर्ण यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. पहिल्या टप्प्यात ५१५ घरकुलांना मंजूरी देण्यात आली होती. त्या घरकुलांकरिता निधी देखील लाभार्थ्यांच्या खात्यावर वळता करण्यात आला. आता पुन्हा ५१५ घरकुलांना मंजुरी मिळाली. लाभार्थ्यांनी घरकुल तयार करण्याचे काम देखील सुरू केले. मात्र, निधी आला नव्हता. नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी १९ जुलै रोजी ग्राम विकास विभागाचे अप्पर सचिव संजयकुमार यांची सचिवालयात भेट घेऊन परिस्थितीची जाणीव करुन दिली. यावर अपर सचिवांनी तातडीने ५१५ घरकुलांना प्रत्येकी १ लक्ष रुपये असा एकूण ५१५ लक्ष रुपयांचा निधी देण्याला मंजूरी दिली. तसेच तातडीने हा निधी नगर पालिकेच्या खात्यावर टाकण्याचे निर्देश त्यांनी अधिनस्त अधिकार्‍यांना दिले. घरकुलाच्या पहिल्या टप्प्याचा निधी लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी दिली.