पीक विमा योजनेत चामोर्शी तालुक्याचा समावेश कराःशेकाप नेत्या जयश्री वेळदा यांची मागणी

0
11

गडचिरोली, दि.23:प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील धान,सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणाकरिता प्रस्ताव सादर करावे, यासाठी प्रशासनाने २४ जुलै ही अंतिम मुदत जाहीर केली आहे. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमधील शेतकरी पावसाअभावी धान,सोयाबीन, कापूस पिकांची पेरणीच करु शकले नाहीत, त्यामुळे पेरणी न केलेल्या पिकांचा विमा संरक्षण प्रस्ताव सादर करायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने विम्याचा प्रस्ताव सादर करण्याची जाहीर केलेली अंतिम मुदत १४ आँगस्टपर्यत वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा,अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री वेळदा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

तसेच जिल्ह्यात कापसाचे पीक घेण्याचे प्रमाण वाढले असून, चामोर्शी तालुक्यातील जवळपास सर्वच गावांत अलीकडच्या काळात कापसाची पेरणी करण्यात येत असल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत चामोर्शी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांचा समावेश करुन या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून द्यावा व दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री वेळदा यांनी केली आहे.