सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आत्मा’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवा-जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

0
12
????????????????????????????????????
  • ‘आत्मा’ नियामक मंडळाच्या सभेत विविध विषयांवर चर्चा

वाशिम, दि. २४ : जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्याची गरज आहे. याकरिता सेंद्रिय शेती व सेंद्रिय शेती पूरक उद्योगांची माहिती देणारे प्रशिक्षण, अभ्यासदौरे यासह विविध उपक्रमांचे आयोजन ‘आत्मा’ मार्फत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा ‘आत्मा’ नियामक मंडळाचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी आज वाकाटक सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तात्रय चौधरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे व्ही. व्ही. गौड, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. पी. एस. घावडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर, तांत्रिक अधिकारी समाधान पडघान, जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. मोरे, मत्स्यविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश भारती, करडा कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आत्मा’ अंतर्गत विविध उपक्रम हाती घ्यावेत. यामध्ये प्रशिक्षणासह अभ्यास दौरे, शेती शाळा याचा समावेश असावा. तसेच जिल्ह्यात सेंद्रिय शेती करणारे शेतकरी गट स्थापण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामध्ये निवडलेल्या गावांमध्ये ‘आत्मा’च्या माध्यमातून शेतकरी गट निर्मितीस प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यात शेतकऱ्यांना विविध योजनांमधून शेततळ्यांचा लाभ देण्यात आला आहे. या शेततळ्यांमध्ये मत्स्य उत्पादन घेवून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येणे शक्य आहे. याकरिता सुद्धा ‘आत्मा’च्या माध्यमातून प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. ‘आत्मा’ मार्फत सन २०१९-२० अंतर्गत आयोजित शेती शाळा, शेतकरी अभ्यास दौरे, प्रशिक्षण, प्रात्याक्षिके आदी बाबींचा आढावा या सभेमध्ये घेण्यात आला.