देवरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा-तालुका काँग्रेस

0
12

देवरी,दि.25(सुभाष सोनवाणे) : तालुक्यातील ८० टक्के शेतामधील धानाचे पऱ्हे पूर्णत: नष्ट झाले. परिणामी तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने देवरी तालुका तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा, या मागणीसाठी देवरी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने २३ जुलै रोजी माजी आ. रामरतन राऊत, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटिया यांच्या नेतृत्वात देवरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. .

निवेदनात सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामात देवरी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे रोवणी होऊ शकली नाही व शेतातील ८० टक्के पऱ्हे नष्ट झाले आहेत. आता हंगामाचा वेळ निघून गेल्यामुळे तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे. शासनाने तत्काळ देवरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत द्यावी, पीकविम्याची रक्कम शासनाने स्वत: भरावी, रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करावी, शासकीय रुग्णालयात औषधी व डॉक्टरांची सोय उपलब्ध करावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी या मागण्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात दौरा करून शेतपिकाची पाहणी केली. या चमूत सहषराम कोरोटे यांच्यासह माजी सभापती वसंत पुराम, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, धनराज चुटे, मोहन वाढई, राकेश मेंढे, योगराज चुटे, दिलीप सिरसाम, भोजराज पटले यांचा समावेश होता.शिष्टमंडळात संगीता भेलावे, माधुरी राऊत, कविता वालदे, धनपत भोयर, अविनाश टेंभरे, अमित तरजुले, चैनसिंग मडावी, माणिकबापू आचले, कमलेश पालिवाल, सुरेंद्र बन्सोड, सुभाष कोचे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.