धोबीसराड येथे राहत्या घरासह गुरांचा गोठा आगीत स्वाहा

0
12
देवरी,दि.27- येथून नजीक असलेल्या धोबीसराड येथे काल शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागून राहत्या घरासह गुरांचा गोठा आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली. या अग्निकांडामुळे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सविस्तर असे की, धोबीसराड येथील रहिवासी असलेले लखन राऊत यांच्या राहत्या घराला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता राहत्या घरासह गुरांचा गोठा सुद्धा जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सचिव निलेश वालोदे यांनी घटनस्थळी धाव घेत लोकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी श्री वालोदे यांनी राउत या पिडीताला शासनाने सहकार्य करण्याची मागणी सुद्धा केली आहे.
या आगीत राऊत यांच्या घरातील सर्व साहित्य, दागिने आणि अन्नधान्यासह रोख 40 हजार रुपये असे एकूण 1 लाख 56 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अग्निकांडाचे बळी ठरलेल्या कुटुंबीयांची आमदार संजय पुराम यांनी भेट घेऊन दोन हजार रुपयाची मदत केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने देवरीचे तहसीलदार विजय बोरूडे यांनी  राऊत कुटुंबीयांनी 15-15 किलो गहू तांदळासह डाळ, साखर आणि 5 हजार रोख अशी मदत केली.