आष्टी-बल्लारपूर मार्गावरील दहेली गावाजवळ पर्यायी पूल वाहून गेला

0
19

चंद्रपूर/गडचिरोली,दि.२९: चंद्रपूर जिल्ह्यातील आष्टी-बल्लारपूर मार्गावर असलेल्या दहेली गावाजवळचा मातीचा बांधलेला पर्यायी पूल सोमवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास वाहून गेला.
या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने त्याला लागूनच पर्यायी रास्ता सिमेंट पाईप टाकून तयार करण्यात आला होता.हा पर्यायी रस्ताच वाहून गेल्याने या ठिकाणी वाहतूक व्यवस्था खोळंबिली. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद असून, भामरागड व अहेरी तालुक्यातील सुमारे शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. काल रात्री व आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने नद्या व नाले दुथडी भरुन वाहत आहेत. चामोर्शी तालुक्यातील दिना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने चौडमपल्ली नाल्याला पूर आला आहे. यामुळे आष्टी-आलापल्ली मार्ग बंद झाला आहे. छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने भामरागडजवळून वाहणारी इंद्रावती नदी फुगून वाहत आहे.

भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-भामरागड रस्ताही बंद झाला आहे. भामरागड तालुक्यातील दूरध्वनीसेवा व वीजपुरवठा ठप्प आहे. पेरमिलीजवळच्या नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने पेरमिली-भामरागड मार्ग बंद आहे.अहेरीनजीकच्या गडअहेरी पुलावरुन पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय याच तालुक्यातील देवलमरी-व्यंकटापूर, तसेच अहेरी-महागाव हा रस्ताही पुरामुळे बंद झाला आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गही बंद झाला आहे.