कोसमतोंडी-थाडेझरी मार्गावरील पुलाला भगदाड

0
10

सडक अर्जुनी,दि.29ः-तालुक्यातील सौंदड जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या कोसमतोंडी-थाडेझरी मार्गावरील पुलाच्या मधोमध मोठे भगदाड पडले आहे. यामुळे या पुलावरून आवागमन करणार्‍या पादचार्‍यांसह वाहनचालकांचा जीव टांगणीला आला आहे. या पुलावरून आवागमन करणार्‍यांना कधीही अपघात होऊ शकतो. जि.प. सार्वजनिक बांधकाम विभाग व वन्यजीव विभागाने लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर व जंगलव्याप्त परिसरात थाडेझरी हे गाव आहे. थाडेझरी हे गाव पुनवर्सित असून वनग्राम गाव आहे. या मार्गावरील या पुलाचे व रस्त्याचे काम नागझिरा अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांतर्गत वन्यजीव विभागाने करायला पाहिजे. विशेष म्हणजे दरवर्षी कोट्यवधी रुपये रस्ते व नाला दुरुस्तीच्या नावावर येतात. मात्र, वन्यजीव विभाग अर्धे काम कागदोपत्री दाखवून परवाना नसलेल्या कंत्राटदाराचे नावे बिल काढून अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही असे म्हणून काम केल्याचे दाखवितो. वन्यजीव विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे वनग्राम थाडेझरी येथील अनेक विकासकामे रखडली आहेत. नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र साहाय्यक कार्यालय कोसमतोंडी येथे आहे. या मागार्ने वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारी नेहमी आवागमन करतात. मात्र, या मार्गावर पडलेले भगदाड व मोठमोठय़ा खड्डय़ांकडे त्यांचे लक्ष जात नाही. तसेच थाडेझरीजवळील मारबत ढोडीवरील रपटासुद्धा पूर्णत: उखडलेला आहे. या रपट्याची साधी डागडुजी केली नाही. या पुलाला पडलेले भगदाड ५ वर्षाअगोदर जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजविले होते. मात्र, आता या पुलाला वर्ष २0१८ मध्ये मधोमध मोठे भगदाड व मोठमोठे खड्डे पडले असून कधीही या ठिकाणी अपघात होऊ शकतो.
या मार्गावरील या पुलाचे बांधकाम जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आले होते. तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत कोसमतोंडी-थाडेझरी या मार्गाचे बांधकाम करण्याची मंजुरी असूनसुद्धा वन्यजीव विभागाने वर्ष २0११-१२ मध्ये काम रोखले होते. यावेळी जि.प. सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदाराने कोसमतोंडी-थाडेझरी मार्गाचे मंजूर झालेले काम कोसमतोंडी-बोळुंदा या मार्गाच्या कामावर निधी खर्च केला. कोसमतोंडी-बोळुंदासमोर शेतशिवारात जाणार्‍या पांदण रस्त्यापयर्ंत डांबरीकरणाचे काम केले. तेव्हा या बिगर मंजुरीच्या कामाचे बिंग फुटले. थाडेझरी या गावांतर्गत येणारे रस्ते, नाल्यावरील पुलाचे बांधकाम वन्यजीव विभागाने करायला पाहिजे. मात्र, वन्यजीव विभागामुळे या गावातील विकासकामे रखडली आहेत.
कोसमतोंडी – थाडेझरी मार्गावरील सदर पूल रस्त्यापेक्षा खोल तयार करण्यात आला. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी साचून या मार्गावरील वाहतूक बंद होत असते. पुराचे पाणी कमी होण्यासाठी तासन्तास ये-जा करणार्‍यांना वाट पहावी लागते. हा एकमात्र मार्ग असल्याने वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अनेक वर्षांपासनूा या पुलाकडे संबंधित जि.प. सार्वजनिक बांधकाम विभाग व वन्यजीव विभागाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. दरम्यान जि.प. सार्वजनिक बांधकाम विभाग व वन्यजीव विभागाने या पुलाचे नव्याने बांधकाम करून उंच पूल तयार करावा, अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.