पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी विविध पुरस्कारांचे वितरण

0
25
????????????????????????????????????

वाशिम, दि. १6 : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था यांना भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कामगारीबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे, अव्वल कारकून नामदेव सुखदेव निमकंडे यांना यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असताना दिलेल्या सेवेबद्दल पोलीस नायक कैलास चिंतामण नागरे यांन आंतरिक सुरक्षा सेवा पदक पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी महसूल रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्थेला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री हा विभागस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय हरित सेने अंतर्गत पर्यावरणविषयक उप्रकम राबविल्याबद्दल व विविध प्रकारच्या स्थानिक वृक्ष प्रजातीच्या बिया जमा केल्याबद्दल एस. एम.सी. इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक अभिजित मुकुंदराव जोशी व इयत्ता ५ वीतील विद्यार्थी सुरज विनोद वाझुळकर यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कपस्पर्धेत राज्यस्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त बोरव्हा ग्रामपंचायत, कारंजा तालुकास्तरावर अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त जानोरी, दोनद बु. व जामठी खु. ग्रामपंचायत, मंगरूळपीर तालुकास्तरावर अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त पिंप्री खु., चिंचाळा व जांभ ग्रामपंचायतीला पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच पानी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे, तालुका समन्वयक रवींद्र लोखंडे, प्रशांत अवचार, अतुल तायडे, समाधान वानखेडे, अनिल वाघ यांचाही प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.

सन गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हास्तरावर अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त टणका (ता. वाशिम), ढोरखेडा (ता. मालेगाव) आणि विळेगाव (ता. कारंजा) यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त वाशिम अभियान राबवून उत्कृष्ट कामगिरी करणारे भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांच्यासह तालुका समन्वयक व क्षेत्र समन्वयक यांचाही यावेळी पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ उपक्रमातील जिल्हास्तरीय विजेत्या १० महिला बचत गटांना पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र व २ लक्ष रुपये रकमेचे धनादेश प्रदान करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विदर्भ केसरी ज्ञानेश्वर गादेकर याचा पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.