जलपुर्नभरण व भूगर्भातील जलसाठा वाढीचे नियोजन करा- खा. सुनिल मेंढे

0
13

भंडारा (19 ऑगस्ट:- 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पाणी परिषदेच्या निमित्ताने पाणी प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्यासाठी भंडारा-गोंदिया जिल्हयात विविध उपाय योजना राबविण्याचा उद्देश आहे. या निमित्ताने जलपुर्नभरण व भूगर्भातील जलसाठा वाढीचे नियोजन संबंधित विभागाने परिषदेत सादर करावे, अशा सूचना खासदार सुनिल मेंढे यांनी दिल्या. तहसिल कार्यालय साकोली येथे आज आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार बाळा काशिवार, जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते, गोंदिया जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उपवन संरक्षक विवेक होशिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार व जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, कृषी व जलसंधारण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पाणी व्यवस्थापन, पाणी टंचाई, शेतीसाठी दुबार सिंचन, पुरव्यवस्थापन, ग्रामीण भागात 24 तास पिण्याचे पाणी या विषयावर पाणी परिषद होणार आहे. भंडारा गोंदिया जिल्हयाच्या पाणी प्रश्नावर आयोजित या परिषदेस केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये पिण्याचे पाणी, सिंचन, जलयुक्त शिवार, जलपुर्नभरण या चार महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. चर्चेतून सुचविण्यात येणाऱ्या उपायांवर लोकसहभागातून येत्या पाच वर्षापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करुन पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पाण्याची उपलब्धता व त्याचे नियोजन हा महत्वाचा अजेंडा असणार असून पाणी व्यवस्थापन, सिंचन, मामा तलावांचे खोलीकरण, जलयुक्त शिवारची कामे या महत्वाच्या बाबी असून या अनुषंगाने परिषदेत दोन्ही जिल्हयाचे सादरीकरण अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयातील सर्व पाणी साठयांचे जिओ टॅगिंग आवश्यक असल्याचे सांगून खासदार म्हणाले की, दोन्ही जिल्हयातील जलसाठयाचा अद्ययावत अहवाल या परिषदेत ठेवणे अपेक्षित आहे. भंडारा-गोंदिया दोन्ही जिल्हे मामा तलावाचे जिल्हे म्हणून ओळखले जात असून या तलावाच्या खोलीकरणाचे व जलपुर्नभरणाचे नियोजन आगामी पाच वर्षात करावयाचे आहे.
या अनुषंगाने कृतिआराखडा तयार करण्याला प्राधान्य देण्यात यावे. यासाठी लागणारा निधी केंद्र शासन उपलब्ध करुन देणार आहे. कृतिआराखडा तयार करतांना भविष्याचा विचार करुन करण्यात यावा. जेणेकरुन पाणी प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्यासाठी मदत होईल. जलयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांच्या शिवारात सिंचन सुविधा निर्माण झाल्या ही या अभियानाची यशस्वीता आहे. जलयुक्त शिवार अंतर्गत कमी पैशात अनेक नाले तसेच तलावाचे खोलीकरण करण्यात आले. यामुळे भूगर्भातील जलसाठा वाढला. जलयुक्त शिवार अभियानाच्या गोंदिया व भंडारा जिल्हयातील यशकथा या परिषदेत सादर करण्यात याव्यात.
पाणलोट क्षेत्राची माहिती या बैठकीत सादर करण्यात यावी. जोपर्यंत रब्बी पिकाचे उत्पन्न वाढणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, रब्बी पिकाला पाणी उपलब्ध करुन देण्याचे वेळापत्रक ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये लावण्यात यावे, असे त्यांनी सूचविले. या परिषदेला सरपंचासह जलतज्ञ, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपलब्ध राहणार आहेत. पाणी प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्यासाठी सर्वंकष नियोजन सादर होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.